आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधीच पक्षांतील महत्त्वाचे नेते, कार्यकर्त्यांची पळवापळव सुरू झाली आहे. निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समितीचे स्वीकृत सदस्य सुनील गणाचार्य यांनी आज शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसल्याचे बोलले जाते.

पुढील दोन महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीची धामधूम आतापासूनच सुरू झाल्याचे दिसते. निवडणुकीआधीच मुंबईच्या राजकीय वर्तुळातील तापमान ऐन थंडीत कमालीचे वाढलेले दिसत आहे. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे पोस्टरवॉर सुरू आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांमध्येच सध्या वाकयुद्ध सुरू आहे. आता हे युद्ध आणखीनच भडकण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या आधीच पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समितीचे सदस्य असलेले गणाचार्य यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेला हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

सुरेश गंभीर यांच्याकडे पक्षनेतृत्वाने कोणत्याही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या नसल्याने ते कमालीचे नाराज होते. त्यामुळे त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. पण गणाचार्य यांचा पालिका निवडणुकीत पराभव होऊनही पक्षाने त्यांना बेस्ट समितीचे स्वीकृत सदस्यपद दिले होते. मात्र, त्यांनी कोणत्या कारणामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपत प्रवेश केला, याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, भाजपने शिवसेनेचे दोन्ही मोहरे गळाला लावण्यात यश मिळवले आहे, असे बोलले जाते. तर या पक्षांतरामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत, असे बोलले जाते. विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत युती होईल, असे संकेत कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडुपमध्ये जलबोगद्याच्या लोकार्पणप्रसंगी दिले होते. त्यामुळे भाजप-सेनेची ‘दोस्ती तुटायची नाय’ अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होती. मुख्यमंत्र्यांनीही महापालिकेच्या कामांची स्तुती करून युतीला अनुकूल असल्याचेच संकेत दिले होते. पण आता शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी भाजपत प्रवेश केल्याने दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर आगामी महापालिका निवडणुकीत संभाव्य युतीच्या आशाही मावळल्याचे बोलले जाते.