पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर पक्षात शक्यतो वेगळी भूमिका घेण्याची राष्ट्रवादीत प्रथा नसली तरी भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या मुद्दय़ावरून काही नेत्यांनी उघडपणे विरोधी भूमिका मांडली. पक्षातील अस्वस्थता लक्षात घेऊनच प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचा निर्णय कसा योग्य आहे, असा उपदेशाचा डोस बुधवारी पाजला.
अलिबागच्या शिबिरात भाजपच्या पाठिंब्यावरून वेगवेगळे मतप्रवाह मांडले गेले. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यावरून जयंत पाटील, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही नेत्यांनी विरोधी भूमिका मांडली. अल्पसंख्याक आपल्यापासून दूर जातील, असे आव्हाड यांचे म्हणणे होते. जयंत पाटील आणि जाधव यांनी विरोधी सूर लावला. विशेष म्हणजे अजित पवार यांनी वरिष्ठांचा आदेश पाळायचा असतो, असे सांगत या विषयावर थेट भाष्य टाळले.
भाजपला पाठिंबा देण्यावरून पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळी भूमिका असल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाने घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फारुक अब्दुल्ला, ममता बॅनर्जी वा रामविलास पासवान आदी नेते भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होते वा अजूनही आहेत. त्यांच्या निधर्मवादाबद्दल कशी शंका घेतली जात नाही. स्थैर्याच्या मुद्दय़ावरच आपण सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. अन्यथा निवडणुकांना सामंोरे जाण्याची तयारी आहे का, असा सवालही पटेल यांनी केला.