काँग्रेस पक्ष राज्यातही कुमकुवत झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ही पोकळी भरून काँग्रेसची जागा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पक्षवाढीसाठी आक्रमक नेतृत्व पुढे आणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून कामगिरी बजावण्यावर भर देण्यात आला आहे. बुधवारी होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये प्रदेश पातळीवर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर अन्य निवडींबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची सोमवारी बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांनाच कायम ठेवावे, असा प्रवाह असला तरी पक्षवाढीसाठी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असे मत काही नेत्यांनी मांडल्याचे समजते. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू आहे. पण अजित पवार यांना मान्य होईल, अशाच नेत्याला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
तटकरे हे अजितदादांचे निकटवर्तीय मानले जातात. सर्व समाजांना बरोबर घेण्याच्या दृष्टीने शक्यतो बिगरमराठा नेत्याला संधी दिली जाईल. त्यातच तटकरे यांना अध्यक्षपदासाठी कमी कालावधी मिळाला आहे हा मुद्दा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणारा आहे. अध्यक्षपदी फेरनिवड व्हावी ही तटकरे यांचीही इच्छा आहे.
काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरात सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले. देशातच काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे. याचा फायदा उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव असताना ही जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपासून झालेल्या विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. याउलट राष्ट्रवादीची परिस्थिती सुधारत आहे. नवी मुंबईत यश मिळाले. राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच पर्याय देऊ शकतो, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.
राष्ट्रवादीने कितीही प्रयत्न केले तरीही काँग्रेसची जागा राष्ट्रवादी भरून काढू शकणार नाही, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादीची भाजपशी वाढलेली जवळीक, विविध मुद्दय़ांवर सत्ताधारी भाजपला मदत होईल अशी भूमिका यामुळे सर्वसामान्य काँग्रेसच्या पाठीशीच राहतील, असेही ठाकरे यांचे म्हणणे आहे.

नवी मुंबईत काँग्रेसबरोबर आघाडी
नवी मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसबरोबर आघाडी झाली असून, काँग्रेसला उपमहापौरपद व अन्य समित्यांवर पदे दिली जातील, असे तटकरे यांनी जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच राष्ट्रवादीबरोबर आघाडीस मान्यता दिली असल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कोणती भूमिका घेतली हे महत्त्वाचे ठरत नाही, असेही तटकरे म्हणाले.

मुंबईत सचिन अहिर?
मुंबईचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याऐवजी सचिन अहिर यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महिला अध्यक्षपदासाठी नव्या नावाचा विचार होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेससह विविध पदांवर नव्या चेहऱ्यांची वर्णी लावली जाईल.