गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर हजारो खासगी गाडय़ा, शेकडो खासगी बसगाडय़ा आणि हजारो एसटीच्या बसगाडय़ा यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. एसटीतर्फे सोडण्यात येणाऱ्या १७९५ जादा बसगाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा पुणे-सातारा-कोल्हापूर मार्गाने तळकोकणात उतरवण्यात याव्यात, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे. मात्र या मार्गाने गेल्यास एसटी महामंडळाला २५ लाख रुपयांचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे एसटी महामंडळ या मार्गाने जाण्यास तयार नसल्याचे समजते.
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी मुंबईहून खासगी वाहनांची आणि एसटीच्या बसगाडय़ांची रीघ लागते. यंदाही गणेश चतुर्थीच्या दोन रात्री आधीपासून दर रात्री मुंबईहून तब्बल आठ ते दहा हजार खासगी वाहने, २०० ते २५० खासगी बसगाडय़ा आणि तब्बल ३५० एसटीच्या गाडय़ा कोकणात जायला निघणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एवढय़ा गाडय़ांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यातच एखादा अपघात झाल्यास किंवा एखादी गाडी बंद पडल्यास वाहनांच्या रांगा मैलोन्मैल लागतात.
या वाहतूक कोंडीचा ताण महामार्ग वाहतूक पोलिसांवर पडतो. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी एसटीच्या गणपती विशेष गाडय़ा पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर या मार्गाने नेण्याची सूचना केली आहे. मात्र, या मार्गावरील टोलनाक्यांवर एसटीला अद्याप टोलमाफी नाही. तसेच हा मार्ग लांबचा असल्याने एसटीला जादा इंधन खर्च करावे लागणार आहे. हा फटका तब्बल २५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी या मार्गाने गाडी नेण्यास उत्सुक नसल्याचे समजते.

गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचा वेळ जाणार असेल, तर एसटी पुणे मार्गाचा पर्याय पडताळून पाहील. मात्र या मार्गावरील टोलनाक्यांवर लागणाऱ्या रांगांमुळेही वेळ जाणार आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत नेमका किती वेळ आणि इंधन वाया जाते, ही तूट नव्या मार्गाने गेल्यास भरून निघणार का, याबाबत विचार करावा लागणार आहे.
– संजय खंदारे, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक