लग्न ठरवायचे म्हटले की दोन कुटुंबांतील व्यक्ती महिनोंमहिने तुडुंब खरेदी आणि विविध नियोजनांच्या मागे स्वार होतात. हिंदी चित्रपटांतील ‘छायागिती’ नसले, तरी व्यापांचा नाच कुटुंबांतील वडिलधाऱ्यांसोबत तरुणतुर्कानाही चुकत नाही. लगीनगोंधळाच्या व्यापगर्दीत गुप्तहेरवारीचा आणखी नवा व्याप जोडला गेला आहे. लग्न झाल्यानंतर वधू किंवा वराकडून होणाऱ्या फसगतीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याने नियोजित वधू-वराची खरी माहिती काढण्यासाठी पालकांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही, तर लग्न जमविणाऱ्या संकेतस्थळांनीही फसवणुकीमुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी गुप्तहेरांकडे धाव घेतली आहे.
धावपळीच्या आजच्या काळात लग्न जमविण्यासाठी कमी वेळ असतो. अनेकदा वधू-वर परदेशातून केवळ लग्न करण्यासाठी भारतात येतात. त्यामुळे लग्न जमविणाऱ्या संकेतस्थळांकडे लोकांचा कल असतो. परंतु त्यात दिलेली माहिती अनेकदा खोटी निघते.  ‘तोतया’ वरांनी संकेतस्थळांवर जाहिराती देऊन मुलींची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस येतात . वधु किंवा वराची खरी माहिती काढणे सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यामुळे  खासगी गुप्तहेरांकडे जाण्याचा कल वाढला आहे.साधारण आठ ते पंधरा दिवसांत गुप्तहेर सर्व माहिती काढून देतात. त्यासाठी पस्तीस हजार रुपयांपासून अगदी एक ते दीड लाख रुपयांपर्यंतचा दर आकारला जातो.

काम कसे चालते?
 गुप्तहेर विद्यापीठात संपर्क साधून, ते काम करत असलेल्या कंपनीत जाऊन शहानिशा करतात. त्यांचे काही प्रेमसंबंध आहेत का त्याचीही माहिती काढली जाते. फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटची मदत घेतली जाते. काही गुप्तहेर संस्थांचे प्रतिनिधी अगदी त्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्येही स्थान मिळवून माहिती काढतात. अनेक प्रकरणांत दिलेली माहिती खोटी असल्याचे दाखवून दिल्याने बरीच जमलेली लग्न मोडल्याचे रजनी पंडित यांनी सांगितले.

लग्न ठरल्यावर तो मुलगा कसा आहे, तो नोकरी कुठे करतो, त्याची सांगितलेली शैक्षणिक माहिती खरी आहे का, त्याचे कुटुंबीय कसे आहे इथपासून त्याच्या नावावर काही गुन्हेगारी नोंद आहे का त्याची माहिती आम्ही काढून देतो, लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने आमच्याकडे अशा पद्धतीची कामे खूप वाढली आहेत. – रजनी पंडित,  गुप्तहेर