* पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त ग्रंथ
* मंगळवार, ८ डिसेंबर रोजी प्रकाशन
पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविणाऱ्या पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरकमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘ग्रंथाली’तर्फे ‘पॉप्युलरचे अंतरंग’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. ८ डिसेंबर रोजी मुंबईत दादर येथे होणाऱ्या एका विशेष समारंभात प्रसिद्ध लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
१९५२ मध्ये गंगाधर गाडगीळ लिखित ‘कबुतरे’ आणि अरविंद गोखले लिखित ‘कमळण’ या कथासंग्रहांचे प्रकाशन करून पॉप्युलर प्रकाशन संस्थेने प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले.
मराठी आणि इंग्रजी पुस्तक प्रकाशन व्यवसायात ‘पॉप्युलर’ने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. ग्रंथाली प्रकाशित करणार असलेल्या ग्रंथातून तीन भागांत मराठी साहित्याच्या जडणघडणीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पॉप्युलर प्रकाशनाचा इतिहास उलगडला जाणार आहे.
पॉप्युलर प्रकाशनाचे सर्वेसर्वा रामदास भटकळ यांनी पहिल्या वीस वर्षांतील लेखकांचा आढावा ग्रंथात घेतला आहे. मृदुला जोशी, अंजली कीर्तने, शुभांगी पांगे, अस्मिता मोहिते या सहसंपादकांचे लेख आहेत. तसेच मराठीतील मातब्बर लेखकांनी भटकळ यांच्या घेतलेल्या मुलाखतींचाही समावेश आहे. या मुलाखतींमधून पॉप्युलरने विविध साहित्य प्रकारातील प्रकाशित केलेल्या पुस्तकांबाबतचे विवेचन वाचकांच्या समोर येणार आहे.
ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी (नाटक), विचारवंत व लेखक रंगनाथ पठारे (कादंबरी), वसंत पाटणकर (समीक्षा), ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर (चरित्र व आत्मचरित्र), व्यंगचित्रकार वसंत सरवटे (पुस्तक मांडणी, मुखपृष्ठ)यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. कथा साहित्याचे प्रयोजन (अरुणा दुभाषी), कविता संग्रहांचे प्रकाशन (सुधा जोशी) याचाही आढावा ग्रंथात घेण्यात आला आहे.
८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता धुरू हॉल, दादर (पश्चिम) येथे होणाऱ्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास रामदास भटकळ, उषा मेहता, ज्योती सुभाष, अमृता सुभाष, ओमकार गोवर्धन, श्रीधर फडके हे उपस्थित राहणार आहेत. पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त प्रकाशन संस्थेवरील ध्वनिचित्रफीतही या वेळी दाखविण्यात येणार आहे.