नेहमी वेगवेगळे घोटाळे बाहेर काढून विरोधी पक्षाला नामोहरम करणारे आणि शिवसेनेला अंगावर घेणारे अशी ओळख असणाऱ्या खासदार किरीट सोमय्यांना मुंबईतील पोस्टर वॉरचा फटका बसला आहे. किरीट सोमय्यांच्या व्यंगावर बोट ठेवत चक्क मुंबईतील नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर ‘बीदेपी त्वबलावल ललणाल- टिलित सोमैय्या’ अशा आशयाचे पोस्टर लावून त्यांच्या बोलण्याच्या शैलीची खिल्ली उडवण्यात आली आहे. हे पोस्टर कुणी लावले याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोस्टरबाजीतून सोमय्यांना दिलेले हे उत्तर असल्याचे बोलले जाते. परंतु यामुळे मुंबई पुन्हा एकदा राजकीय पोस्टरबाजीला पुन्हा सुरूवात होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी किरीट सोमय्या चर्चेत आहेत. कधी विरोधी पक्षांच्या घोटाळे बाहेर काढण्यात ते मग्न असतात. तर कधी शिवसेनेबरोबरील त्यांचा वाद चर्चेत असतो. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे माध्यमांसमोर म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत त्यांच्या बोलण्याच्या शैलीतच हे पोस्टर चक्क भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. त्यामुळे गुरूवारी दिवसभर राजकीय क्षेत्रात याचीच मोठ्याप्रमाणात चर्चा रंगली होती. दरम्यान, यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.