देवधर्म, तंत्रमंत्र यांच्या नावाखाली सराफांकडून सोने लुटून पोबारा करण्यात या टोळीचा हातखंडा. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, आसपासच्या राज्यांतही या टोळीने अक्षरश: धुमाकूळ मांडला होता. परंतु सीसीटीव्हीतील एका चित्रणाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या..

रायगड जिल्ह्य़ातील कर्जत, खोपोली, माणगाव, पोलादपूर आणि सुधागड या तालुक्यांत एकाच पद्धतीने सराफांची फसवणूक व सोनेचोरीच्या सहा घटना उजेडात आल्या होत्या. कमी वर्दळ असलेल्या ठिकाणच्या दुकानांत जाऊन तेथील सराफांची फसवणूक करणे आणि त्याच्याजवळील सोने घेऊन पोबारा करणे, अशी सारखीच कार्यपद्धत या सहाही गुन्ह्य़ांमध्ये वापरण्यात आली होती. मे आणि जून अशा दोन महिन्यांत घडलेल्या या गुन्ह्य़ांमुळे रायगड पोलीसही चक्रावले होते. पण कुठूनही या सोनेचोरांपर्यंत पोहोचणारा धागा हाती लागत नव्हता.

रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी या सर्व घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडे हे प्रकरण सोपवले. पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांच्याकडे तपासाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने सुरुवातीपासून प्रकरणाचा तपशील मिळवण्यास सुरुवात केली. फसवणूक झालेल्या दुकानदारांचे जबाब पुन्हा घेण्यात आले. तसेच आसपासच्या परिसरात चौकशी सुरू झाली. तपासादरम्यान दोन गुन्ह्य़ांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. यातील एका चित्रणात आरोपीचा चेहरा दिसत होता. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास पुढे नेण्याचे ठरवले.

सीसीटीव्ही चित्रणातील आरोपी व्यक्तीचे छायाचित्र व त्याआधारे तयार करण्यात आलेले रेखाचित्र घेऊन राज्यभरात कुठे या व्यक्तीवर गुन्हे दाखल आहेत का, याचा शोध सुरू करण्यात आला. सुदैवाने ठाणे जिल्ह्य़ातील आंबिवली येथे या व्यक्तीशी साधम्र्य असलेल्या वसीम सिराज अब्बास या व्यक्तीवर चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक तातडीने आंबिवली येथे पोहोचले. पण वसीमला थेट ताब्यात घेण्याऐवजी या पथकाने त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सर्व चोऱ्या एकच व्यक्ती करत असावी, असा पोलिसांचा संशय होता. परंतु, वसीम सातत्याने तीन व्यक्तींच्या संपर्कात होता, असे पोलिसांना आढळले. वसीमला आधी ताब्यात घेतले तर अन्य तिघे फरार होतील, अशी पोलिसांना भीती होती. त्यामुळे या तिघांचे ‘मोबाइल लोकेशन’ही पोलिसांनी तपासले. तेव्हा एक जण उत्तर प्रदेश व अन्य दोघे मध्य प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्य़ांत असल्याचे आढळून आले. मग या चारही जणांना एकाच वेळी ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलिसांची पथके त्या त्या ठिकाणी पाठवण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा गुन्हे अन्वेषण पथकाचा विचार होता.

ठरल्याप्रमाणे पोलिसांच्या पथकांनी आपली कामगिरी बजावली व तीन राज्यांतील चार वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी या चौघांना ताब्यात घेण्यात आले. जयकुमार रजक याला जबलपूर येथून, धृवकुमार त्रिपाठी याला उत्तर प्रदेशमधून, इरफान खान याला मध्य प्रदेशमधील भोपाळ येथून पकडण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान रायगड जिल्ह्य़ातील चोरीच्या घटनांमागे या चौघांचाच हात होता, हे स्पष्ट झाले. त्याचबरोबर या चौघांनी अन्य राज्यांतही अशा प्रकारे २१ गुन्हे केल्याचे समोर आले. यात नागपूर शहरात ११, पुणे शहरातील २, पुणे ग्रामीणमधील ३ तर पालघर, अहमदनगर, यवतमाळ, चंद्रपुर, मुंबई येथील प्रत्येकी एक अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तर राज्याबाहेर मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान एकत्र येऊन असाच अनेक लोकांना गंडा घातल्याचे  मान्य केले.

या टोळीची कार्यपद्धत ठरावीक होती. गुन्ह्य़ापूर्वी चौघे जण एकत्र भेटायचे. मग एक मोटारसायकल आणि एक कार घेऊन पुढील प्रवासाला निघायचे. लहानमोठय़ा शहरांतील कमी गहबज असलेल्या ठिकाणच्या दुकानांची टेहळणी करून ही टोळी पुन्हा शहराबाहेर येऊन थांबत असे. यानंतर टोळीचा मुख्य सूत्रधार वसीम कारमधून उतरून मोटारसायकल ताब्यात घेत असे व ‘ठरलेल्या’ दुकानात दाखल होत असे. ‘मंदिर बांधायचे आहे, मंदिराचा जिर्णोद्धार करायचा आहे, मंदिरावर सोन्याचा कळस चढवणार आहे, मोठा यज्ञ होणार आहे, त्यासाठी पैसे गोळा केले आहेत. तुमच्या पैशाला आणि सोन्याला हे पैसे लावा, म्हणजे या धार्मिक कार्यात तुम्हालाही पुण्य लागेल,’ अशा भाकडकथा सांगून तो दुकानदारांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर पूजनासाठी म्हणून सोने हातात घेई व मंतरलेल्या कागदात गुंडाळून दुकानदाराच्या हातात देई. पण हे करत असताना तो सोने आपल्याकडेच ठेवत असे व दुकानदाराला काही कळण्याच्या आत घटनास्थळावरून पसार होत असे. शहराबाहेर आल्यावर मोटारसायकल दुसऱ्या साथीदाराच्या ताब्यात देऊन तो स्वत: कारने पसार होई. टोळीच्या या कार्यपद्धतीमुळे पोलिसांना गुंगारा देण्यात ते सहज यशस्वी होत.

अशा प्रकारे अनेक गुन्हे या टोळीने पचवले होते. परंतु अखेर सीसीटीव्हीतील एका चित्रणाच्या आधारे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. या संपूर्ण तपासात पोलिसांनी प्रचंड संयम दाखवला. वसीमचा शोध लागल्यानंतरही त्याला थेट ताब्यात न घेता त्याच्या साथीदारांची माहिती मिळवली व चौघांनाही एकाच वेळी अटक केली. त्यामुळे ही संपूर्ण टोळीच नेस्तनाबूत झाली. रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे जितेंद्र व्हनकोटी, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक कराडे, कर्जत पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार दोरे, पोलीस हवालदार हंबीर, पोलीस हवालदार मोरे आणि पोलीस हवालदार एम. बी. पाटील यांच्या पथकांनी या गुन्ह्य़ाचा तपासात मोलाची कामगिरी बजावली.