मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा हतबल प्रश्न

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तरतुदींची घोषणा करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्वच्छतेवर भर दिला असला, तरी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील घाण कमी होण्याची चिन्हे कमी आहेत. रेल्वे याबाबत काय करणार, असा प्रश्न मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना विचारताच ‘आम्ही लाख स्वच्छ करू, पण ते रेल्वेमार्ग स्वच्छ ठेवणार का’, असा हतबल उलटप्रश्न केला. रेल्वेने आपल्या हद्दीतील कचरा उचलताच मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या हद्दीत रेल्वेमार्गालगत राहणाऱ्या वस्त्यांमधून पुन्हा तेवढाच कचरा रूळांवर पडतो. याबाबत रेल्वेने काय करावे, असा उद्विग्न प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेमार्गावर प्रचंड कचरा पडत असून त्यामुळे काही ठिकाणी वेगमर्यादाही लावण्यात आल्या आहेत. यात विक्रोळी-कांजूरमार्ग, पारसिक बोगदा आणि परिसर, डोंबिवली-कोपर परिसर, मानखुर्द-गोवंडी या भागांचा समावेश आहे. रेल्वेतर्फे हा कचरा उचलण्यासाठी हार्बर आणि मुख्य मार्गावर दर रात्री तीन तीन कचरा गाडय़ा चालवल्या जातात. रेल्वेमार्गावर फिरून हा कचरा गोळा करताना कामगारांच्या जीवाला धोकाही असतो. तरीही रेल्वे आपल्या परीने हा कचरा उचलण्याचे काम करत असते, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.

रेल्वेकडून हे प्रयत्न होताना मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांकडून मात्र या प्रयत्नांमध्ये काहीच सहकार्य होताना दिसत नाही. ठाण्यात तर पारसिक बोगदा परिसरात लोहमार्गाच्या बाजूला तीन वेळा उंचच उंच भिंती बांधण्यात आला आहे. तरीही पलिकडल्या वस्त्यांमधून हजारो टन करचा रेल्वेमार्गावर पडतो. हा कचरा रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक ठरूनही ठाणे महापालिकेकडून म्हणावी तशी कारवाई झालेली नाही, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.