मुंबईत आज(रविवार) झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘राजगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  विधानसभेत मनसे आमदारांनी केलेली निवडक भाषणे ‘राजगर्जना’ या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना बदलत्या काळाप्रमाणे स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला. प्रत्येक राजकारणी माणसाला समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे भान असणे गरजेचे असल्याचे राज यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलताना, येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात राज्याच्या विकासाची योजना स्पष्ट करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी राज यांनी पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर टीका केली. पोलीस भरतीसाठीचे कालबाह्य झालेले निकष पडताळून पाहण्याची गरज राज यांनी भाषणात व्यक्त केली.