एरवी कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळणारे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत वेगळाच राग आळवला. पक्षाचे काडीचेही काम न करणाऱ्या आणि भाजप सरकारमध्ये सत्तापदे मागणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच खडसावले. पक्ष बांधणीकडे दूर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी बैठकीतच तीव्र नापसंती व्यक्त केली.
रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची शनिवारी मुंबईत बैठक झाली. त्या वेळी भाजपने विधानसभा निवडणुकीत लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे सत्तेतील सहभागाचा विषय निघाला. मंत्रीपदाचे काय, एमएलसी, महामंडळे, शासकीय समित्यांवर नियुक्त्या मिळणार की नाही, अशी चर्चा सुरु झाली. रामदास आठवले यांनी त्यावर, भाजपने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र त्याचबरोबर आपण राज्यात मंत्रीपद स्वीकारणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्याला केंद्रातच मंत्रीपद मिळाले पाहिजे, असा आग्रही त्यांनी धरला. रिपाइंला १० टक्के सत्तेत वाटा हवा, अशी आमची मूळ मागणी होती. परंतु शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे रिपाइंला ५ टक्के सत्तेत सहभाग मिळाला, तरी चालेल, असे त्यांनी सांगितले.  बैठकीत सत्तापदांची चर्चा सुरु असताना आठवले मात्र एकदम पदाधिकाऱ्यांवर भडकले. कुणाला मंत्रीपदे, आमदारक्या, सत्तेची पदे पाहिजेत, परंतु ज्यांनी पक्षाची पदे घेतली आहेत, ते पक्षबांधणीचे, पक्ष वाढविण्याचे किती काम करतात, असा सवाल त्यांनी केला. भाजपने एक कोटींची सदस्य नोंदणी केली, रिपाइंने अजून सभासद नोंदणीला सुरुवातही केली नाही, त्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. स्थानिक स्तरावर कुणीही कार्यकर्त्यांची कामे करीत नाही, त्यामुळे माझ्याकडे सातत्याने गर्दी होत आहे, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.