टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील वैज्ञानिकांकडून तंत्रज्ञान विकसित, कोटय़वधींचा खर्च लाखांवर
हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत-पाक सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आजही भारत-पाक सीमेवरील ४० ठिकाणे अशी आहेत की जिथे कोणतीही भिंत नाही. तर काही ठिकाणी संरक्षक भिंत उभारणेही अवघड आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर अशा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर भिंत उभारण्याची निकड भासू लागली. संरक्षण मंत्रालयानेही संवेदनशील ठिकाणांवर लेझर भिंत उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील (टीआयएफआर) वैज्ञानिकांनी विकसित केले असून लवकरच संरक्षण खात्याकडे या प्रयोगाचे सादरीकरण केले जाणार आहे.
पठाणकोट हल्ला झाला त्यावेळी भारत-पाक सीमेवरील ४० पैकी फक्त पाच-सहा ठिकाणांवरच लेझर भिंतीचा वापर केला जात होता. मात्र, हल्ल्यानंतर आता सर्वच ठिकाणांवर लेझर भिंती उभारण्याचे संरक्षण विभागाने ठरवले. या भिंतींच्या उभारणीसाठी सध्या वापरात असलेले परदेशी तंत्रज्ञान खूपच खर्चीक आहे. या पाश्र्वभूमीवर टीआयएफआरच्या वैज्ञानिकांनी परदेशी तंत्रज्ञानाच्या तोडीस तोड असेच तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने सीमावर्ती भागातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली असून याबाबतचा प्रस्ताव आता संस्थेमार्फत संरक्षण विभागाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो लवकरच सादर करण्यात येणार आहे.
डॉ. अचंता वेणुगोपाळ, डॉ. श्रीगणेश प्रभू, डॉ. सुनील गुप्ता आणि डॉ. रघुनंदन या वैज्ञानिकांचा हे तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वाचे योगदान आहे.
प्रयोग नेमका काय..
* ज्या भागात संरक्षक भिंत उभारणी शक्य नसते त्या भागांत लेझर भिंतीची भींतींची उभारणी केली जाते
* यासाठी एका ठिकाणाहून काही किमी अंतरापर्यंत लेझर प्रकाश सोडला जातो. हा प्रकाश अदृश्य स्वरुपात असतो. एक प्रकाशझोत वरच्या बाजूने आणि एक प्रकाशझोत खालच्या बाजूने सोडलेला असतो.
* आवश्यकतेनुसार प्रकाश झोत सोडणाऱ्या दिव्याच्या क्षमता बदलता येते. याच्या एका बाजूला ‘रिसिव्हर फोटोडायर’ वापरला जातो
* फोटोडायरमुळे त्या भागात झालेल्या हालचालींची बारीकसारीक माहिती टिपता येते
सध्या बाजारात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान खर्चीक आहे. टीआयएफआरमध्ये विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वच यंत्रणा टीआयएफआरमध्येच तयार केली जाणार असल्याने येणारा खर्चही कमी आहे.
– डॉ. शशिकांत दुगड, तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या चमूतील वैज्ञानिक