‘असोसिएशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्तराँ’चा खुलासा

हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये सेवा आकार (सव्‍‌र्हिस चार्जेस) लागू करण्याचा निर्णय नवीन नसून अनेक व्यावसायिक आपल्या खाद्यपदार्थाच्या यादीवर हा आकार आधीपासूनच नमूद करीत आहेत. ज्या ग्राहकांना हा आकार भरायचा नाही त्यांना संबंधित हॉटेलमध्ये खाण्याची सक्ती नाही. असे ग्राहक परत जाऊ शकतात. मात्र खाद्यपदार्थ मागविल्यानंतर संबंधित हॉटेलच्या सेवेविषयी नापसंती व्यक्त करत ग्राहक सेवा आकार भरण्यास नकार देऊ शकत नाहीत. त्यांना सेवा कर भरावाच लागेल, अशी विरोधाची भूमिका ‘असोसिएशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्तराँ’तर्फे (आहार) घेण्यात आली आहे.

सेवा आकाराबाबत केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकावर खुलासा करताना आहारचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी हा नियम पहिल्यापासूनच अस्तित्वात होता. यात नवीन असे काहीच नाही. त्यामुळे, आमच्या व्यवसायावर याचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईत आहारचे साधारणपणे आठ हजार हॉटेल व्यावसायिक सदस्य आहेत.

सेवा आकाराबाबत केंद्राने केलेल्या खुलाशावर आहारची भूमिका जाणून घेण्यासाठी शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘अनेक हॉटेल व्यावसायिक आपल्या खाद्यपदार्थाच्या यादीवर ५ ते १० टक्के सेवा आकाराचा उल्लेख करतात. त्यामुळे ग्राहकांना अंधारात ठेवून आम्ही हा आकार त्यांच्याकडून वसूल करत नाही. ज्या ग्राहकांना हा आकार मान्य नसेल ते परत जाऊ शकतात. त्यामुळे केंद्राच्या खुलासात नवीन काहीच नाही.’  मात्र हा खुलासा करताना केंद्राने हा आकार सेवेबाबत संतुष्ट नसलेल्या ग्राहकांवर सक्तीचा नसेल, असेही म्हटले आहे.

एकदा का खाद्यपदार्थ ग्राहकांनी मागविले तर त्यांना सेवा आकार भरणे सक्तीचे राहील. कारण सेवेबाबत संतुष्ट असले तरी आपणहून सेवा आकार भरण्यास फार कमी ग्राहक तयार होतील. त्यामुळे सेवा समाधानाचा सेवा आकाराशी संबंध जोडणे चुकीचे आहे.

आदर्श शेट्टी, अध्यक्ष, आहार