सुनील कुलकर्णीची कोठडीत रवानगी; मोबाइल, पेन ड्राइव्हमध्ये अश्लील छायाचित्रे

स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजविघातक शिफू संक्री ती  या अत्यंत बीभत्स विचारसरणीचा प्रसार करणारा बोगस डॉक्टर सुनील सदाशिव कुलकर्णी याला मुंबई गुन्हे शाखेने अखेर अटक केली. न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. स्वत:ला मानसोपचारतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या कुलकर्णीच्या डॉक्टरी पदव्या (एमबीबीएस, एमडी-सायकॅट्रिक) बोगस असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाल्याची माहिती मिळते. त्याच्या पदव्या बोगस असूनही तो प्रभावाखाली असलेल्या तरुणींना औषधांची नावे लिहून देत असे. ती घ्यायला भाग पाडत असे, अशीही माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

त्याचे मोबाइल फोन, पेन ड्राइव्हमध्ये अनेक तरुण-तरुणींची नग्न छायाचित्रे, अश्लील चित्रफिती, संभोग करताना चोरून घेतलेले चित्रण साठवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. हे सर्व तरुण शिफू संस्कृतीच्या पर्यायाने कुलकर्णीच्या प्रभावाखाली असल्याचा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. गुंगी येईल, मेंदूवरील नियंत्रण सुटेल अशी औषधे देऊन तो तरुणींसोबत, तरुणींकडून अश्लील कृत्ये करत, करवून घेत असावा, असाही संशय गुन्हे शाखेला आहे. भविष्यात प्रभावाखाली आलेल्या तरुणींचा वापर वेश्याव्यवसायासाठी होणार होता का या दृष्टीनेही गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याचे समजते. मुंबई बीभत्स विचारसणीवर आधारलेल्या शिफू संस्कृतीच्या विळख्यात सापडल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकसत्ताने दिले होते.

कुलकर्णीच्या प्रभावाखाली येऊन विचित्र वागणाऱ्या, घर सोडून स्वतंत्रपणे राहाणाऱ्या दोन तरुण मुलींच्या पालकांनी पोलीस तपास व्हावा, ही मागणी घेऊन उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  बुधवारी सायंकाळी दक्षिण मुंबईतून कुलकर्णीला गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले, रात्री उशिरा अटक केली.

सगळाच बडेजाव

कुलकर्णीचे व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेडवरील एमबीबीएस, एमडी(मानसोपचारतज्ज्ञ) असा उल्लेख आढळला. तो स्वत:ला राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचा महासचिव असल्याचेही भासवतो. मुंबई, दिल्लीतल्या नामांकित महाविद्यलये, शिक्षण संकुलांमध्ये व्याख्याता, प्राध्यापक म्हणून काम केल्याचे सांगतो.  नागपूर येथील एका प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतल्याचा त्याचा दावा आहे. प्रत्यक्षात गुन्हे शाखेने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे केलेल्या चौकशीत कुलकर्णी डॉक्टर असल्याची थाप मारत असल्याची माहिती समोर आल्याचे समजते. गुन्हे शाखेने याबाबत परिषदेकडून लेखी अहवाल मागवला आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार कुलकर्णी विवाहित असून त्याला दोन अपत्ये आहेत, मात्र तो कुटुंबापासून स्वतंत्र राहातो.

अनेकजण प्रभावाखाली

स्वातंत्र्य मिळवून देतो, कौटुंबिक कलह, पालकांची कटकटीपासून प्रत्येक अडीअडचणींवर इलाज करतो असे आमिष दाखवून कुलकर्णीने १८ ते २५ वयोगटातील अनेक तरुण-तरुणींना आपल्या प्रभावाखाली घेतले असून त्यांना गुंगीचे औषध देऊन अश्लील कृत्यांसाठी वापर करत असावा, असा संशय पोलिसांना आहे.

मुळचा नागपूरचा

मूळचा नागपूरचा पण दिल्लीत स्थायिक असलेला कुलकर्णी खार-वांद्रय़ातील लिटील फोर अपार्टमेन्टमध्ये भाडय़ाने घर घेऊन राहात होता. याचिकाकर्त्यां पालकांच्या दोन मुलीही अन्य एका तरुणीसह याच खोलीत राहात होत्या. अटकेनंतर गुन्हे शाखेने तेथे धाड घातली. तेव्हा ट्रायपटॉम-ई-आर व अन्य औषधे, दोन मोबाइल, पेन ड्राइव्ह,  आधार-पॅन कार्ड, संबंधित तरुणींचे मास्टर कार्ड,  चेकबुक आणि लैंगिक शिक्षणाची पुरतके अशा वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या.

शिफू संक्रीती काय आहे?

मुंबई आणि परिसरात ‘शिफू संक्रीती’च्या  विळख्यात काही तरुण-तरुणी गुरफटत चालले आहेत. शिफू संक्रीतीचे पाईक म्हणविणारे काही लोक अस्वस्थ तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतात. घरच्या मंडळींकडून घातल्या जाणाऱ्या बंधनांचा बागुलबुवा त्या तरुण-तरुणींपुढे उभा केला जातो. नैराश्य आलेल्या तरुण-तरुणींना हेरून त्यांना मानसिक आजारांवरील औषधे देऊन ‘शिफू संक्रीती’च्या मोहजालात ओढून घेण्यात येते शिफू संक्रीती या नावाने संकेतस्तळ उपलब्ध असून त्यावर लैंगिक बाबींविषयक आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे.