केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा; निविदा प्रक्रियेला सुरुवात 

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या १७ एकर जागेत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. १ हजार खाटांच्या या रुग्णालयात प्रामुख्याने पोर्ट ट्रस्टचे आजी-माजी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांवर उपचार करण्यात येणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

ते गुरूवारी पोर्ट ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पोर्ट ट्रस्टच्या कॉटन ग्रीन येथील जागेत असलेल्या तीन इमारती टाटा मेमोरियल रूग्णालयाला कर्करूग्णांच्या उपचारासाठी गडकरींनी हस्तांतरीत केल्या. या इमारतींमध्ये टाटा रूग्णालयात  येणाऱ्या बालरूग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची निवासाची व्यवस्था सेंट ज्यूड इंडिया चाईल्ड केअर संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, टाटा मेमोरियल रूग्णालयाचे संचालक डॉ. आर. ए. बडवे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, सेंट ज्यूड इंडिया चाईल्ड केअर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उषा बॅनर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ची जागा खूप मोठी असून यातील एक फूट जागा देखील बांधकाम व्यवसायिकांना देणार नाही. तसेच नजीकच्या काळात येथे मोठे रस्ते बांधण्यात येतील. समुद्रात जाणाऱ्या प्रदूषित पाण्याला अटकाव करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. तसेच, येत्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १७ एकर जागेत अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांची संख्या ही ५० हजाराहून अधिक आहे. त्यांच्यासाठी प्रामुख्याने हे रुग्णालय उभारण्यात येईल. तसेच, येथे इतर सामान्य नागरिकांनाही आरोग्य सेवा पुरविण्यात येईल. यातील ७० टक्के जागा सामान्यांसाठी असतील, तर ३० टक्के खाटा या सशुल्क असतील. असे गडकरी यांनी या वेळी सांगितले.

गरीब नागरिकांना मुंबईत औषधे व आरोग्य सेवेसाठी झुंजावे लागते. देशभरातून मुंबईत कर्करोगावरील उपचारासाठी रूग्ण येत असतात. त्यांना जागेअभावी रस्त्यावर रहावे लागते आणि यात लहान मुलांचाही समावेश असतो. त्यामुळे या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वापरात नसलेल्या या ३ इमारती व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी म्हणून टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आल्या आहेत. या इमारतींवर १७ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तसेच, त्यांना अजून ३ इमारतींची सोय उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी टाटा रुग्णालय आणि सेंट ज्यूड या संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पहिले बालरुग्ण निवासी केंद्र

मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मिळालेल्या तीन इमारतींमध्ये कर्करोगग्रस्त लहान मुले व त्यांच्या कुटुंबियांची राहण्याची व खाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. येथे एकावेळी १६५ कुटुंबे राहू शकतात. रूग्णांसह त्यांच्या कुटुंबियांची सोय करणारे हे आशियातील पहिले केंद्र आहे. कर्करोग झालेल्या लहान मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. मात्र, मुलांच्या उपचारासाठी त्यांना येथे जवळपास ८ ते ९ महिने रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या पालकांना येथे रोजगार मिळेल याची व्यवस्था केली जाणार असून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था देखील केली जाईल. ही सगळी व्यवस्था सेंट ज्यूड या सामाजिक संस्थेतर्फे पाहिली जाणार आहे. अशी माहिती टाटा मेमोरियल रूग्णालयाचे संचालक डॉ. आर. ए. बडवे यांनी दिली.

रस्त्याला डांबराचा मुलामा

मुंबई पोर्ट ट्रस्टचा कार्यक्रम कॉटन ग्रीन पूर्वेकडील त्यांच्या जागेत गुरुवारी पार पडला. मात्र, गडकरी येणार म्हणून कार्यक्रम स्थळापासूनच्या १ किलोमीटर रस्त्याला डांबराला  मुलामा देण्याचे काम करण्यात आले. डांबराच्या खडीची बारीक माती थेट रस्त्यावर टाकून हा रस्ता सपाट करण्याचे काम करण्यात आले. तसेच हे काम गडकरी येण्याच्या तब्बल तासभर आधीपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सूत्रांकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.

तिकीट मागणाऱ्यांचा वीट

रुग्णसेवा ही खरी समाजसेवा आहे. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना याबाबत नेहमी सांगत असतो. मात्र, हल्ली सगळे तिकीट मागण्यासाठी पुढे असतात. बायकोपासून वाहन चालकापर्यंत प्रत्येकासाठी तिकिटांची मागणी हल्ली सर्रास केली जाते. या सगळ्याचा मला वीट आला आहे, अशी खंतही गडकरी यांनी व्यक्त केली.