मुंबईतील अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक असलेल्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य फादर फ्रेझर मास्करेन्हान्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पत्र लिहून विचारपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना त्यांनी गुजरातमधील मोदींच्या कामाचे जे चित्र रंगविले जात आहे त्याचा सारासार विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांच्या शिक्षण धोरणावर टीका केली आहे.
विद्यार्थ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये फादर मास्करेन्हान्स यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या संस्थेला नॅकने ‘अ’ दर्जा दिला असला तरी त्यांना स्वायत्तता मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि त्यानंतर आपल्याला न्याय मिळाल्याचे नमूद केले आहे. यावरून तेथील शिक्षण व्यवस्था कशी आहे हे लक्षात येते. तर सरकारी आकडेवारींनुसार गुजरातमधील मानव विकास निर्देशांक गेल्या दहा वर्षांत खालावत चालला असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात लिहले आहे. याचबरोबर गुजरातच्या सध्याच्या विकासाचे मुद्दे खोडून काढणारे अनेक मुद्दे त्यांनी
मांडले आहे.
पत्राचा शेवट करताना त्यांनी सध्याच्या निवडणुकीकडे पाहताना आपल्याला असे समजते आहे की, देशात कॉर्पोरेटमधील निधी आणि धर्मीय शक्ती सत्तेवर येऊ पाहत आहेत. तसे झाले तर भविष्यात याचा सर्वात मोठा फटका आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीला बसेल अशा शब्दांत केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे. हे पत्र महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरही अपलोड करण्यात आले आहे.  

मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून केवळ विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आणि योग्य दिशेने मतदान करावे या उद्देशाने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात मी मानव विकास निर्देषांक, पर्यावरण आणि आपला सर्वधर्मीय समाज या विषयाबाबत डोळसपणे विचार करण्यास सांगितले आहे.
-फादर मास्करेन्हान्स, प्राचार्य, सेंट झेविअर्स महाविद्यालय