उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा (लाउडस्पीकर) पुरवणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याच्या ठाणे पोलिसांच्या निर्णयाचे ठाणेकरांनी समर्थन केले आहे. पोलिसांच्या या निर्णयाचा निषेध म्हणून उत्सवकाळात ‘साउंड’ न पुरवण्याच्या लाउडस्पीकर व्यावसायिकांच्या निर्णयाचेही सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. व्यावसायिकांनीच बहिष्काराचे शस्त्र उगारल्याने ‘सुंठीवाचून खोकला गेला’ अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिक देत आहेत.
उत्सवांच्या दुकानदारीसाठी शिमगा
ठाण्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच दहीहंडीचा उत्सवही दणक्यात साजरा होतो. मात्र, दहीहंडीच्या दिवशी आयोजकांकडून दिवसभर डीजेंचा दणदणाटही सुरू असतो. मात्र, बहुतांश मंडळे राजकारण्यांची असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, यंदा ठाण्याचे पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी उत्सवांच्या काळात ज्याठिकाणी ध्वनिप्रदुषणाच्या मर्यादेची पातळी ओलांडली जाईल, तेथे ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या ठेकेदारावरच कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांवर दबाव वाढवण्यासाठी त्यांनी यंदा उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी ठाण्यात यासंबंधी झालेल्या एका बैठकीत लाऊडस्पीकर असोसिएशनने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
‘लाऊडस्पीकर्स संघटनेची ही भूमिका टोकाची आणि दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाने आवाजाच्या पातळीविषयी र्निबध घालून दिले आहेत. त्यांचे पालन व्हावे, इतकीच अपेक्षा आहे,’ अशी प्रतिक्रिया ठाण्यातील ध्वनिप्रदुषण विरोधी कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दिली. तर लाउडस्पीकर्स पुरवणाऱ्या संघटनेनेच स्वत:वर ध्वनिमर्यादा घातली तर, कर्णकर्कश आवाजातून उत्सवाची मुक्तता होईल, असे सामाजिक कार्यकर्त्यां गीता शहा या म्हणाल्या.
बेलगाम साऊंड्सवर पूर्ण
बंदी घाला : पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये आणि ठेकेदारांनीही आपला बहिष्कार मागे घेऊ नये, अशी भूमिका ऋतुपार्क ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी सुधाकर कुलकर्णी यांनी मांडली. डीजे, डॉल्बीसारखे साउंड वापरुन प्रदुषण करणाऱ्यांवर कायमची बंदी घालण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.