सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता अशा दुष्टचक्रात अडकलेल्या विद्यमान राजकरण्यांपासून चार हात लांब राहिलेल्या दिनकर बाळू ऊर्फ दिबा पाटील या नि:स्वार्थी, निष्कलंक, निर्मळ तपस्वीने या जगाचा सोमवारी निरोप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्मीम भक्ती असलेले पण डाव्या विचारसरणीची पताका आयुष्यभर खांद्यावर घेतलेले पनवेलचे माजी नगराध्यक्ष, पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार आणि दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद भूषविणारे दिबा पाटील यांनी आपले आयुष्य प्रकल्पग्रस्तांच्या सेवेसाठी वेचले होते. १६ जानेवारी १९८४ रोजी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी दिबा यांनी जासई येथे उभारलेले ‘करो या मरो’च्या आंदोलनाने राज्य सरकार हादरून गेले होते. या आंदोलनात पाच शेतकऱ्यांचा बळी गेल्याने त्याची दखल देशपातळीवर घ्यावी लागली. याच आंदोलनाची परिणती म्हणून येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजने अंतर्गत विकसित भूखंड मिळाले. त्यानंतर या योजनेचा दाखला देशात दिला जाऊ लागला. त्यामुळे साडेबारा टक्केयोजनेचे दिबा एका अर्थाने जनक म्हणावे लागतील.
महात्मा गांधींच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या दिबा यांना त्या वेळच्या इंटरची परीक्षा देता आली नाही, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी नंतर विधी अर्थात एलएल. बी. पूर्ण करून वकिलीचा काळा कोट अंगावर चढविला, पण तोही अल्पकाळच. १९५१ ते ५६ या पाच वर्षांत थोडीफार वकिली करून त्यांनी हा कोट कायमचा उतरवून ठेवला. त्यानंतर त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला तो जीवनभर सांभाळला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पगडा असलेल्या दिबा यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिल्याने रयत शिक्षण संस्थेच्या १०९ शाळा राज्यातील खेडोपाडय़ांत सुरू होऊ शकल्या आहेत. वाशी, पनवेल येथील महाविद्यालय उभारणीमध्ये दिबा यांचा सिंहाचा वाटा आहे. नाना पाटील यांचे बोट धरून शेकाप पक्षाची धुरा सांभाळणारे दिबा यांनी १९९९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक दोस्तीमधून हा शिवसेना प्रवेश दिबा यांना नंतर बोचत राहिला. त्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी कुलाबा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली खरी पण आपल्याच शिष्याच्या हातून (रामशेठ ठाकूर) त्यांना पराभव पत्करावा लागला. ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक असल्याची कबुली नंतर दिबा यांनी जाहीरपणे दिली होती. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकरणाला अलविदा केल्याचे दिसून येत होते. पनवेलच्या नगराध्यक्षपदासाठी लोकांमधून थेट निवडणूक लढविणाऱ्या दिबा यांना पराभव हा माहीत नव्हता पण १९९९ मध्ये झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या दिबा यांच्या आंदोलनाचा दरारा मात्र कालपरवापर्यंत कायम होता. सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या पूर्ण न केल्याने अलीकडे एका सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वयाच्या ८६ व्या वर्षी दिबा यांनी या आंदोलनाला हजेरी लावली होती. व्हीलचेअरवर बसूनच ते या आंदोलनासाठी बेलापूरमध्ये आले होते. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन हाती घेताना प्रत्येक पक्षातील नेत्याला अगोदर दिबा यांचा कौल घ्यावा लागत होता इतकी जरब दिबा यांनी तयार केली होती. प्रकल्पग्रस्तांची आंदोलने करताना प्रकल्प नको अशी भूमिका दिबा यांची नव्हती हे विशेष. प्रकल्प सुरू करण्याअगोदर प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असा सूर दिबा यांचा होता.