घाऊक बाजारात प्रतिकिलो ९९ रुपये, दीड वर्षांतील कमी किंमत

गेल्या वर्षभरापासून गगनाला भिडलेल्या तुरडाळीच्या किंमती पंधरवडय़ापासून खाली उतरण्यास सुरुवात झाली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना कृषीमालाचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारात उत्तम प्रतीची तुरडाळ किलोमागे ९९ रुपयांपर्यंत खाली घसरली आहे.

कमी दर्जाच्या तुरडाळीची विक्री ८० रुपयांपासून होत असून मुंबईच्या बाजारातील गेल्या दीड वर्षांतील हे सर्वात कमी दर असल्याचा दावा बाजार समिती प्रशासनामार्फत केला जात आहे. जून महिन्यात डाळींच्या किंमती लवकरच कमी होतील असा दावा सरकारने केला होता. तसेच ९५ ते १२० रुपयांपर्यंत तुरडाळीची विक्री सुरू केली आहे.

या पाश्र्वभूमीवर महिनाभरापुर्वी घाऊक बाजारात १२० ते १४० रुपयांनी विकली जाणारी तुरडाळीच्या किंमती किलोमागे सरासरी ४० रुपयांनी कमी झाल्या आहेत. दरम्यान, घाऊक बाजारात डाळींच्या स्वस्ताईचा हंगाम सुरु झाला असला तरी मुंबई, ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकाच दर्जाच्या डाळींच्या किंमती वेगवेगळ्या असून त्या अजूनही १२० रुपयांपेक्षा अधिक आहेत.

घाऊक बाजारात दर कमी झाल्याने किरकोळीतही ते व्हायला हवेत. मात्र, चढय़ा दराने डाळी खरेदी करणाऱ्या शहरांमधील किरकोळ तसेच घाऊक व्यापाऱ्यांनी अद्याप सर्वसामान्य ग्राहकांना चढय़ाच दरांनी डाळींची विक्री सुरु ठेवली आहे, असा दावाही या अधिकाऱ्याने केला.   केंद्र शासनाने डाळ आयातीस परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात डाळीची आवक झाली असून देशांतर्गत असलेल्या दरापेक्षा आयात डाळीचे दर कमी आहेत. यामुळे बाजारपेठेतील गणिते  बदलली आहेत. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे  डाळीची मुबलक उपलब्धता आहे.

daal