मतदानाच्या तारखा जवळ येत असल्याने पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न पालिकेत अधिकच महत्त्वाचे ठरू लागले आहेत. पाणीकपातीच्या प्रश्नावर प्रशासनाकडून आलेले उत्तर फेटाळून लावत महापालिकेच्या स्थायी समितीत सत्ताधारी नगरसेवकांनी गोंधळ घातला. खोदलेल्या रस्त्याच्या मुद्दय़ावरून सभा तहकूब करण्यात आली.
मुंबईत दररोज होत असलेला पाणीपुरवठा एकसमान आहे. त्यामुळे पाणीकपात होत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तर मोडकसागर तलावाजवळ सुरू असलेल्या कामामुळे पाण्याची पातळी खाली ठेवणे आवश्यक होते व त्यामुळे काही दिवस पाणी कपात करण्यात आली होती, असे उत्तर प्रशासनाकडून मंगळवारच्या बैठकीत देण्यात आले. सर्व दिवस समान पाणीपुरवठा सुरू होता असे प्रशासनाने आधी सांगितले असताना आता पाणीकपात होती, असे उत्तर देऊन प्रशासनानेत स्वत:च्या उत्तरातील विसंगती दाखवून दिली आहे, असे सांगत शिवसेना- भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतले.
ब्रीच कॅण्डी रुग्णालयासमोर खोदलेल्या रस्त्याच्या मुद्दय़ाला सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दिला. प्रशासनाकडून कोणतेही उत्तर ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या नगरसेवकांनी सभा तहकुबीची सूचना मांडली व अध्यक्षांची ती मान्य केली.