केंद्र सरकारच्या ग्रंथमालेत हेडगेवार, मालवीय, उपाध्याय ; गांधी-नेहरूंना स्थान नाही

आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार? केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘आधुनिक भारताचे निर्माते’ या ग्रंथमालिकेतील नामावलीवर नजर टाकल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या ग्रंथमालिकेच्या सूचीमध्ये गांधीजींचे तर नावच नाही, जवाहरलाल नेहरूंचे नावही वगळण्यात आले आहे, तर हेडगेवार यांच्याबरोबरच हिंदू राष्ट्रवाद किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडणारे मदनमोहन मालवीय, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्याचे सरकार बराच उदोउदो करीत असले तरी त्यांना केवळ हिंदूी ग्रंथमालेपुरते स्थान देण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकाशन विभागाच्या वतीने विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. त्यातच ‘आधुनिक भारत के निर्माता’ ही हिंदीत व ‘बिल्डर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ ही इंग्रजी भाषेतील ग्रंथमालिका प्रकाशित करण्यात आली आहे. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार त्या पक्षाचा या प्रकाशन मालिकेवर प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसते. २०१३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथमालिकेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, विनोबा भावे, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि अर्थातच डॉ. हेडगेवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, मदनमोहन मालवीय यांचा समावेश आहे.

२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या हिंदूी ग्रंथमालिकेतही डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रातील सत्तांतरानंतर म्हणजे भाजप सत्तेवर आल्यानंतर २०१५ च्या हिंदी आणि इंग्रजी प्रकाशन मालिकेतून नेहरू, इंदिरा गांधी गायब झाले आहेत. हिंदी ग्रंथमालिकेत पुन्हा आंबेडकर, हेडगेवार आहेत; परंतु इंग्रजीत आंबेडकर दिसत नाहीत. काँग्रेसी दलित नेते बाबू जगजीवनराम यांना काँग्रेस व भाजप सरकारनेही शिरोधार्य मानले आहे.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र शासकीय  प्रकाशन संस्थेच्या ग्रंथमालिकेत आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून अभावानेच स्थान देण्यात आले आहे.

सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा हिंदू राष्ट्रवादाचे आणि सनातन धर्माचेही  समर्थन करणारे मदनमोहन मालवीय, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनाही मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यात काँग्रेस सरकारनेही कसूर केलेली नाही. विशेष म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार ग्रंथमालिकेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद, दादाभाई नौरोजी, न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांचा बहुमान करण्यात आला आहे; परंतु त्यांचेच समकालीन व कृतिशील समाजक्रांतिकारक जोतिबा फुले यांची दखलही घेण्यात आलेली नाही. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तर आधुनिक भारताच्या शिल्पकार मालिकेत उपेक्षाच करण्यात आली आहे.

काँग्रेसचे हेडगेवार प्रेम

काँग्रेस पक्ष ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर धर्माध, जातीयवादी, समाजविघातक शक्ती म्हणून तुटून पडतो, त्या संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरचे काँग्रेसप्रेमही लपून राहिलेले नाही. काँग्रेस सरकारच्या काळात प्रकाशित करण्यात आलेल्या प्रकाशन मालिकेतही आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून डॉ. हेडगेवार यांचा गौरव करण्यात आला होता.