भारतीय संविधानावरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे.  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीतून संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळले. त्यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. रिपब्लिकन पक्ष हा राज्यात भाजपचा मित्र पक्ष आहे. मात्र आठवले यांनी त्या जाहिरातीतून धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळल्याबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. संविधानाच्या सरनाम्यातील हा केवळ शब्द वगळण्याचा प्रश्न नाही तर, हा संविधानिक मुल्यांवर हल्ला आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.