भारतीय जनता पक्षाची तिसऱ्यांदा महापालिकेत सत्ता आल्यानंतर सर्व नगरसेवकांना आपापल्या प्रभागात जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याच्या पक्षाकडून सूचना आल्यानंतर भाजपाच्या एका ज्येष्ठ सदस्य आणि माजी सत्तापक्ष नेत्यांनी प्रभागातील निवासी प्लॅटफॉर्म शाळेतच जनसंपर्क कार्यालय सुरू केले असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सुरू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महापालिकेच्या शाळेच्या इमारतीमध्ये प्लॅटफॉर्म शाळा असून ४० ते ४५ विद्यार्थी त्या ठिकाणी राहतात.

रेल्वेस्थानकावर आढळून आलेल्या मुलांसाठी नागपुरात प्लॅटफॉर्म शाळा सुरू करण्यात आली आणि त्यासाठी हंसापुरी भागातील महापालिकेची बंद असलेली शाळा देण्यात आली. या शाळेची जबाबदारी विश्व हिंदू परिषद जनकल्याण समितीने घेतली. त्यांच्या माध्यमातून गेल्या २३ जून २०१० पासून ही प्लॅटफॉर्म निवासी शाळा त्या ठिकाणी सुरू आहे. सहा विद्यार्थ्यांंपासून सुरू करण्यात आलेल्या या शाळेत ५० ते ५५ विद्यार्थी झाले आणि त्यांच्या निवासाची आणि शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. शाळेची व्यवस्था विश्व हिंदू परिषदेच्या जनकल्याण परिषदेकडे असताना त्यांचे कार्यालय त्याच ठिकाणी आहे. या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. गांधीबाग उद्यानाबाबत गेल्या काही दिवसात त्यांच्यावर टीका होत असताना आता प्लॅटफॉर्म शाळेत जनसंपर्क सुरू केल्याच्या प्रकरणावरून नवा वाद सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दयाशंकर तिवारी यांच्यावर महापालिकेची एक शाळा बळकविल्याचा आरोप माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या नेत्या अल्का दलाल यांनी केला होता. महापालिका या शाळेसाठी निधी देत असून त्या निधीतून या शाळेचा कारभार चालतो. शिवाय काही दानदात्याच्या माध्यमातून मुलांची भोजनाची आणि त्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते. तिवारी यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचा फलक कसा लावण्यात आला, असा प्रश्न संघर्ष समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला.

महापालिकेची शाळेत सध्या प्लॅटफॉर्म शाळा सुरू असली तरी त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यास कुणाचा विरोध नाही. ज्या ठिकाणी प्रभागातील जनता भेटायला येऊ शकते, त्या ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यालय कुठे सुरू करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कुठे तरी कार्यालय असावे, या उद्देशाने शाळेत सकाळच्यावेळी त्या ठिकाणी बसतो आणि जनतेच्या तक्रारी आणि समस्या ऐकून घेत असतो.

– दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक