पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांची ग्वाही
शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्य़ांचा छडा लावणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. मात्र, शहरातील वाहतूक समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असेल तर या समस्या सोडविण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल, अशी ग्वाही नवीन पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम के. यांनी दिली.
नागपूर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सोमवारी पोलीस जिमखाना येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शहरातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना आदी संदर्भात पत्रकारांकडून सूचना मागविल्या. यावेळी पत्रकारांकडून शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, वाहतूक समस्या, महिलांवर अत्याचार, भूमाफिया आदी समस्या सुचविल्या. यावेळी प्रामुख्याने सोनेगावपासून ते ऑटोमोटिव्ह चौक आणि वाडी ते दिघोरीपर्यंत र्सवच चौकातील अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालकांची मुजोरी, पार्किंगच्या समस्येंवर लक्ष वेधण्यात आले. त्यावर आयुक्तांनी शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यास प्राथमिकता देण्यात येईल आणि त्यासाठी एक मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.
नागपूर पोलीस दलात महाराष्ट्रातील सर्वोत्तम आयपीएस अधिकारी कार्यरत आहेत. या चमूने यापूर्वी चांगले काम केले आहे. गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात पोलिसांना मोठय़ा प्रमाणात यश आले असून परिस्थिती अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येणार नाही. मोठय़ा प्रकरणांचा तपास पोलीस झपाटय़ाने करतात आणि लहान व्यक्तीच्या घरी झालेल्या चोरीचा तपास अनेक वष्रे प्रलंबित राहतो, असा आरोप पोलिसांवर होतो. त्यामुळे चोरी, लुटपाट, घरफोडीमध्ये मध्यमवर्गीय लोकांचा पैसा जातो. अशा प्रकरणांचा तपास करण्याला प्राधान्य देण्यात येईल आणि अधिकाधिक नागरिकांना त्यांचा पैसा परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके, पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, ईशू सिंधू उपस्थित होते.

‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांसाठी कंपनीशी चर्चा
गुन्ह्य़ांचा छडा लावणे आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी शंभर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. नागरिकांनीही स्वत:च्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. परंतु शहरातील चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी एका कंपनीशी चर्चा सुरू आहे. लवकरच शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल, असेही डॉ. वेंकटेशम यावेळी म्हणाले.