कचऱ्यामुळे मुलांच्या आयुष्याची माती
शहराचा पसारा वाढत असताना अनेक उद्योगदेखील वाढू लागले आहेत. कोणताही उद्योग उभारण्यासाठी चांगलेच भांडवल लागते. मात्र, कचरा जमा करून त्याचे विभाजन करण्याच्या उद्योगाला विशेष भांडवल लागत नाही. सध्या शहरात कचरा जमा करायचा आणि त्याचा पुनर्वापर करण्यासाठी लागणाऱ्या घटकांचे विभाजन करायचे, असे उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. हे विभाजन करण्यासाठी बाल कामगारांच्या नाजूक हातांचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी चोवीस तास कचऱ्यात वावरणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कचरा गोळा करून वाहून नेणे अथवा त्याचे विभाजन करण्याच्या कामात गरीब कुटुंबातील लोकांचा समावेश असतो. बेरोजगारीमुळे अनेक बालक कचरा उचलण्याचे काम करतात. लोकांनी कचरा म्हणून फेकलेल्या काही वस्तू, धातूचे तुकडे, प्लास्टिक, इलेक्ट्रिकचे सामान ही मुले वेचून आणतात. त्यातील निवडक कचरा पुनर्वापरासाठी उपयोगी येत असल्याने तो वेगळा काढण्यात येतो. तो कचरा पुनप्र्रक्रियेसाठी विकला जातो. भांडेवाडी डंिपग यार्ड व शहरातील काही निवडक वस्त्यांमध्ये असे अनेक छोटे मोठे उद्योग सुरूआहेत. मात्र, उद्योगात काम करणाऱ्या लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचरा निवडताना व त्यातील वस्तूंचे भाग सुटे करताना त्यामधून निघणाऱ्या घातक रसायनांचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. यामध्ये धातूंचे तुकडे वेगळे करताना हाताला जखमा होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. यासोबतच श्वासन व पोटाचे विकार देखील मुलांना होत आहेत. अशात त्वचा रोग, दमा यासारखे आजारांची लागण झालेली मुलांमध्ये आढळून येते. शिवाय सतत प्रदूषणात राहत असल्याने त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. घरातल्या मुला-मुलींची संख्या अधिक असल्याने त्यांना पोसण्याची क्षमता त्यांच्या पालकांमध्ये नसते. अशात काही रोग झाल्यास त्यावर उपचार करण्याची देखील आíथक क्षमता नसल्याने त्यांचा आजार वाढतच आहे. या उद्योगात मुलांच्या आयुष्याची माती होत आहे.

शोधमोहीम सुरू
नागपुरात १४ वषार्ंखालील पाच हजाराहून अधिक बालकामगार आहेत. त्यामध्ये कचऱ्याच्या उद्योगात देखील त्यांचा समावेश आहे. या संदर्भात कोणी आमच्याजवळ तक्रार करताच आम्ही पोलिसांच्या मदतीने त्यांच्या सुटकेसाठी छापा टाकतो. मागील महिन्यात आम्ही आसामवरून अपहरण करून आणलेल्या सहा बालकांची एका प्लास्टिक कंपनीतून सुटका केली. तेथे त्या मुलांकडून अहोरात्र काम करून घेतले जायचे. मात्र, आज देखील नागपुरात अनेक उद्योग आहेत जेथे छुप्या पद्धतीने बालकांकडून काम करून घेतल्या जाते. अशा मुलांच्या सुटकेसाठी आमची शोध मोहीम आजही सुरूआहे.
– मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी