वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक झळकले

आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कुठेही शुभेच्छा फलक लावू नये, त्या ऐवजी यावर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तरीही त्यांच्या गृह जिल्ह्य़ातील उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे पाठ फिरवित शहरातील बहुतांश ठिकाणी स्वत:चे छायाचित्रे असणारे शुभेच्छा फलक झळकावले आहेत.

मुख्यमंत्री किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस साजरा करणे हे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साह साजरा करण्याचा दिवस असतो. त्याची तयारीही पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर फार पूर्वीपासूनच केली जाते. खुद्द मुख्यमंत्रीच नागपूरचे असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह अधिक होता. भाजपच्या शहर शाखेनेही या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र आठवडय़ापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत, यानिमित्ताने फलक लावू नये व त्यावरील खर्च शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरणारा होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे फलकबाजीचे जाहीर प्रदर्शन ठिकठिकणीही झाले नसले तरी काही कार्यकर्ते त्यांच्या उत्साहाला आवर घालू शकले नाही, त्यामुळे त्यांनी फलक लावलेच. रेशीमबाग चौकात माजी आमदार मोहन मते यांनी शुभेच्छा देणारे मोठे फलक लावले आहे. बडकस चौक परिवाराच्यावतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावले आहे. रेशीमबाग, जाफरनगर, बडकस चौक, वर्धमाननगर, मानेवाडा या भागात ठळकपणे मोठे फलक लावले आहेत. काही भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध प्रभागात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीतील गुणवत्ता विद्यार्थ्यांंच्या सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर कुठे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही नगरसेवकांनी कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे फलक लावून त्यात स्वत:चा उदोउदो करून घेतला असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्यूंजय जप, हवन

शेतकऱ्यांच्या समृद्धीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण पश्चिम मतदार संघाच्यावतीने हिंगणा मार्गावरील शिवमंदिरात श्री महामृत्यूंजय जप आणि हवन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी महामृत्यूंजय जप आणि हवन कार्यक्रम आयोजित केला. यावेळी शेतकऱ्यांच्या समृद्धीसोबत दोन वेळा अपघातातून बचावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. यावेळी महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेवक किशोर वानखेडे, मीनाक्षी तेलगोटे, पल्लवी शामकुळे, रमेश भंडारी, शिवाणी दाणी आदी उपस्थित होते.