महापालिका, सा.बां. आणि ग्रीन विजिल आमनेसामने

कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीतील महाराजबागेतून जाणाऱ्या रस्त्यावरून आज पुन्हा नागपूर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरणाच्या संरक्षणार्थ काम करणारी ग्रीन विजिल ही स्वयंसेवी संस्था आमनेसामने उभे ठाकले. महाराजबागेचे वैभव असलेली १०० वर्षे जुनी झाडे या रस्त्यात बळी जाणार असल्याने पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला. त्यांच्या या लढय़ाला अखेर यश आले आणि तब्बल आठ झाडांचा जीव वाचविण्यात आला.

मातृसेवा संघ ते म्युर मेमोरियल, अशा नऊ मिटरच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहराच्या विकासात हे रस्ते भर घालणारे असले तरीही या रस्त्यामुळे महाराजबागेतील झाडांचा बळी जाणार असल्याने सुरुवातीपासूनच पर्यावरणवाद्यांनी या झाडांच्या संरक्षणार्थ भूमिका घेतली. या रस्ते निर्माण कार्यात शंभर वर्षे जुन्या सुमारे २६ झाडांचा बळी जाणार होता. आधीच एका रस्त्यामुळे महाराजबागेचे मोठे प्रवेशद्वार बंद झाले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणात आणि नवीन रस्त्याच्या निर्माण कार्यात महाराजबागेसह कृषी महाविद्यालयाचीही बरीचशी जागा जाणार आहे. मात्र, त्यासाठी कृषी महाविद्यालयाची परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देण्याचा अधिकार महाविद्यालयाला असला तरीही वृक्षतोडीला परवानगी देण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका या संस्थेने घेतली. आमचा विकासाला विरोध नाही, पण विकासात शंभर वष्रे जुन्या झाडांचा बळी कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराला वृक्षतोडीचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत जेव्हा जेव्हा हा कंत्राटदार वृक्षतोडीसाठी महाराजबागेत आला तेव्हा तेव्हा ग्रीन विजिलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना परत पाठवले. मात्र, आज ते संपूर्ण तयारीनिशी महाराजबागेत आले. त्यामुळे ग्रीन विजिलचे कौस्तुभ चटर्जी यांनी अखेर उद्यान अधीक्षक सुधीर माटे व वृक्षसमितीचे सुनील अग्रवाल यांना भ्रमणध्वनी केला. त्यांनी एकत्रितरीत्या या जागेचे सर्वेक्षण केल्यानंतर २६ झाडांमधील ७ झाडे अगदीच लहान असल्याचे निदर्शनास आले, तर आठ झाडे या तोडण्यापासून वाचू शकतात, असेही यावेळी लक्षात आले. त्यामुळे तिघांनीही एकत्रितरीत्या निर्णय घेऊन केवळ ११ झाडे कापण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणवाद्यांच्या या भूमिकेमुळे काही झाडांचा बळी जाण्यापासून वाचला असला तरीही महाराजबागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाचा बळी मात्र यात जाणार आहे, तसेच बिबटय़ाच्या पिंजऱ्याला लागून हे रस्ते जाणार असल्याने प्राणीसंग्रहालयाचे भवितव्य मात्र अधांतरी असल्याचे स्पष्ट झाले.