तब्बल चाळीस टक्के मालाचा उठावच नाही 

दिवाळीत अन्य खरेदीसोबतच फटाके खरेदीही विशेष असते. नागपूरच्या फटाका बाजारात रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. मात्र, यंदा जीएसटी, महागाई आणि पर्यावरणाच्या मुद्यांमुळे फटका बाजारात कमालीची शांतता दिसून आली. यंदा चाळीस टक्केमाल विकला न गेल्याने फटाका व्यापाऱ्यांना कोटय़वधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

जीएसटी आणि नोटाबंदीमुळे नागपूरच्या बाजारापेठेत कमालाची मंदी आली आहे. व्यापारी अद्याप त्यातून सावरलेले नसून दिवाळीच्या सणात थोडाफार दिलासा मिळेल असे आशावादी चित्र होते. मात्र, फटाक्यांवर २८ टक्के जीएसटी असल्याने ग्राहकांनी जास्त आणि महागडे फटाके घेणे टाळले. त्यामुळे फटका बाजारात शांतता होती. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही फटाका बाजारात नावापुरती खरेदी झाली.

विशेष म्हणजे, लहान मुलांना फटाक्याचे आकर्षण असल्याने केवळ त्यांच्या इच्छेपोटी थोडय़ा प्रमाणात फटाके खरेदी करण्यात आले. तसेच दसऱ्यापासूनच बाजारात मंदी असल्याचे लक्षात घेता फटाका व्यापाऱ्यांनीही यंदा कमी प्रमाणात मालाची उचल केली. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची विक्री होत असल्याने व्यापारी फटाक्यांची पुनर्खरेदी करत असतात. मात्र, यंदा ती झाली नाही. आपल्याकडे शिवाकाशी (तामिळनाडू ) येथील कारखान्यातून फटाके येतात, परंतु सर्वत्र मंदी असल्याने फटाका कारखान्यालाही महागाई आणि जीएसटीचा फटका बसला. नागपुरात परवानाधारक १० ठोक फटाका व्यापारी आहेत, तर ७५० किरकोळ व्यापारी आहेत. मात्र, यंदा किरकोळ फटाका व्यापाऱ्यांनाही परवाना देण्यास उशीर केल्याने त्यांनाही मोठा फटका बसला आहे.

शिवाय ग्रीन टॅक्स, स्टॉल उभारण्यासाठीची परवानगी, वजन माप विभागातील अधिकाऱ्यांची तपासणी या सर्व कामकाजासाठी मोठे शुल्क आकारण्यात येत असल्याने त्याचाही फटाका व्यापाऱ्यांना बसला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या बहुतांश व्यापाऱ्यांनी यंदा माघार घेतली आहे.

फटाका व्यापाऱ्यांचा ८० टक्के व्यवसाय हा दिवाळीच्या तीन दिवसात होत असतो. मात्र, यंदा बाजारात असलेली मंदी आणि महागाईमुळे तो निम्म्यावर घसरला आहे. आजही व्यापाऱ्यांचा चाळीस टक्के माल पडून आहे.

जेथे दिवाळीत एका दुकानात २० कर्मचारी असत तेथे आज केवळ चार कर्मचारी काम करत आहेत. शिवाय पर्यावरणवाद्यांच्या आवाहनामुळेही फटाका उचलण्यात आला नाही.

अशी मंदी यापूर्वी बघितली नव्हती 

१९९९ साली दिवाळीदरम्यान खिल्लारी (उस्मानाबाद ) येथे मोठा भूकंप झाला होता. मात्र, सर्वानी संवेदनशीलता जपत दिवाळी साजरी केली. तेव्हादेखील फटाका बाजारात घसरण झाली नव्हती, जेवढी यंदा झाली आहे. आजही तब्बल चाळीस टक्के माल पडून आहे. जरी याला विविध कारणे असली तरी जीएसटी आणि बाजारात रोख पसा नसल्याने मंदी आहे. आम्ही मागील ६० वर्षांपासून या व्यवसायात आहोत, पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मंदी यापूर्वी कधीच बघितली नाही.

प्रल्हाद अग्रवाल, फटाक्याचे ठोक विक्रेता, गांधीबाग.