तिवारी विरोधक सक्रिय, विरोधकांना खतपाणी

ऐतिहासिक गांधीबाग उद्यानातील मोकळ्या भूखंडावर व्यापारी संकुल बांधण्यास स्थानिकांचा विरोध वाढत असून या मुद्यावरून भाजपमध्ये देखील दोन गट पडले आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेली दंगल शांत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सध्याच्या गांधीबागेच्या जागेची साफसफाई करवून तेथे शांती सप्ताह आयोजित केला होता. त्यानंतर या जागेचे गांधीबाग असे नामकरण करण्यात आले. अशाप्रकारे नाव आधी मिळाले आणि नंतर तेथे उद्यान तयार झाले. आता या भागात मोठी कापड बाजारपेठ आहे. तेथील मोकळ्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने उद्यानाला लागून असलेल्या गांधीबाग विभागीय कार्यालय आधी येथून हटवण्यात आले. येथील जलतरण तलाव बंद करण्यात आला. झोनल कार्यालयाची इमारत आणि सोख्ता भवनची इमारत पाडून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मंजूर करवून घेतला होता, परंतु त्यास विरोध होत आहे.

इंदिरा काँग्रेस कार्यकर्ता संघर्ष समितीने हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून लावून धरले आहे. त्याला स्थानिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. आता भाजपमधूनही याला विरोध होऊ लागला आहे.

त्यास भाजपमधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची किनार आहे. मध्य नागपुरात भाजपमध्ये आमदार विकास कुंभारे नंतर कोण, याची चर्चा वारंवार होत असते. या भागात दयाशंकर तिवारीचे महत्त्व वाढणार नाही.

याची पक्ष नेतृत्वाकडून वेळोवेळी खबरदारी घेतली जाते. कस्तुरचंद पार्कवर झालेल्या हनुमान चालिसा पठणाचे प्रकरण देखील अशाच प्रकारे हाताळण्यात आले होते.

आता गांधीबाग उद्यान आणि लगतच्या जागेवर प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या मुद्यांवरून भाजपमधील तिवारी विरोधी गट सक्रिय झाला आहे. त्यांनी संकुल विरोधाला खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गुरूवारी इंदिरा काँग्रेस कार्यकर्ता संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाने महापौर नंदा जिचकार आणि महापालिका आयुक्त अश्विन मुद्गल यांची भेट घेतली. गांधीबाग उद्यानातील बंद असलेला जलतरण तलाव पूर्ववत सुरू करण्यात यावा आणि प्रस्तावित व्यापारी संकुल रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली.

प्रस्ताव काय आहे

गांधीबागेतील मोक्याच्या ठिकाणी ६७०० मीटर जागेवर महापालिकेचे सोख्ता भवन आहे. येथे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ९ मजली वाणिज्यिक संकुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे ९९.४० कोटी रुपये आहे. कंत्राटदार ही रक्कम करेल. त्याच्या वापरातून पैसा वसूल करेल.

मध्य नागपूर सारख्या गजबजलेल्या आणि व्यावसायिक परिसरात मोकळी जागाच उरलेली नाही. परिसरातील मुलांना गांधीबाग हे एकमेव खेळण्याचे आणि नागरिकांना फिरण्याचे ठिकाण आहे. या बगिच्यात व्यापारी संकुल झाल्यास थोडीफार उरलेली मोकळी जागा देखील संपुष्टात येईल. तेव्हा येथे व्यापारी संकुल न उभारता उद्यान विकसित करण्यात यावे.’’

रमण पैगवार, इंदिरा काँग्रेस कार्यकर्ता संघर्ष समितीचे संयोजक