सोन्यात गुंतवणुकीला पहिली पसंती; चार महिन्यांनंतर उत्साहाला उधाण

साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाजारात कोटय़वधी रुपयांची आíथक उलाढाल झाली. मागील १५ दिवसांपासून बाजारपेठा ग्राहकांच्या सेवेसाठी तयारीला लागल्या होत्या. नोटाबंदीमुळे मागील तीन ते चार महिन्यांपासून बाजारात ग्राहक फिरकला नव्हता. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात खरेदीला उधाण आल्याचे दिसून आले.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करणे ही पारंपरिक पद्धत असल्याने नागपूरकरांनी यंदाच्या गुढी पाडव्यालाही बाजारात जोरात खरेदी केली. शहरातील प्रमुख बाजारपेठ बर्डी, सदर, महाल, धरमपेठेत मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत नित्योपयोगी वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. सर्वाच्या आवडीची वस्तू स्मार्टफोनच्या विक्रीवर चांगल्या योजना असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त खरेदी झाली. तसेच घरातील जुन्या प्रकारच्या टीव्ही विकून त्या बदल्यात एलईडी टीव्ही घेण्याकडे कल दिसून आला. तसेच टॅब्स, लॅपटॉप, फ्रीज, वातानुकूलित यंत्रणा शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होत्या. शहरातील प्रमुख मॉल्स गर्दीने फुलले होते. नव्या पारंपरिक कपडय़ांची मागणी होती.

पाडव्याचा सण असल्याने सराफा बाजारात गर्दीला उधाण आले होते. या सणाला प्रामुख्याने सोने खरेदी केली जात असल्याने नागपूरकरांनी कोटय़वधी रुपयांची खरेदी केली. महिलांनी सोन्याचे दागिणे, अंगठय़ा, मंगळसूत्रे, गोफ खरेदीला पसंती दर्शविली. गुंतवणूकदारांनी सोन्याचे बिस्कीट, नाणे खरेदी केले. मागील वर्षीपेक्षाही यंदा जास्त सोने खरेदी झाल्याचे महाराष्ट्र सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले. बाहेरगावून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी गुढी पाडव्याआधीच मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी केली. नोटाबंदीच्या काळात अनेकांचे धाबे दणाणले होते. लोकांनी सोन्यात पसे गुंतवून मोठय़ा प्रमाणात सोने उचलले. मंगळवारी २९ हजार ३५० रुपये सोन्याचा तर ४२ हजार ५०० रुपये चांदीचा दर होता. एकंदरीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने का होईना मंदावलेल्या बाजारपेठात तेजी दिसून आली. जवळपास दोन हजार कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल बाजारपेठे झाली.

७०० दुचाकी, ५० चारचाकी वाहनांची विक्री

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूर शहर आणि पूर्व नागपूर परिवहन कार्यालयात तब्बल ७५० हून जास्त नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. जुन्या वाहनाच्या विक्रीचा बाजारही मंगळवारी तेजीत होता. येथे नव्या वाहनांच्या तुलनेत दुप्पटीहून जास्त वाहनांची विक्री नोंदवल्या गेली. नोटाबंदीनंतर ऑटोमोबाईल व्यवसायावर मंदीचे सावट आले होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरील विक्रीने व्यावसायिकांना दिलासा मिळाला. प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसात शहरात सुमारे ४०० दुचाकी तर ५० चारचाकी वाहन विक्रीची नोंद करण्यात आली. सर्वाधिक विक्री ही पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदवली गेली. विक्रीतून शासनाला सात कोटींहून अधिक महसूल मिळाला. नवीन दुचाकीच्या तुलनेत जुन्या वाहनांची दुपटीहून विक्री झाली. दरम्यान, वाहन खरेदीनंतर पूजेसाठी विविध मंदिरात एकच गर्दी झाली होती. साईबाबा मंदिरात यासाठी रांग लागलेली होती.