दुसऱ्या दिवशीही शहर बससेवा ठप्प; बस चालक-वाहकांचा संप मागे

महापालिकेची शहर बससेवा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशीही ठप्प होती. त्यामुळे या बसेसने प्रवास करणारे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांचे बेहाल झाले. दरम्यान, कालपासून सुरू झालेला संप मिटविण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांनी गांभीर्याने प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले नाही. दिवसभर केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. त्यातून काहीही तोडगा निघाला नाही.

वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी बुधवारी महापालिका बससेवेतील चालक-वाहक संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असताना प्रशासन आणि पदाधिकारी यांनी ही बाब मात्र गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे संप मिटण्याऐवजी तिढा वाढला आहे. चालक व वाहकांना ऑपरेटरकडून अत्यल्प वेतन दिले जाते. नियमानुसार वेतनाची त्यांची मागणी आहे. मात्र, महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन ऑपरेटरची बाजू घेत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांशी निगडित हा प्रश्न असतानाही तातडीने तो सोडवून लोकांना दिलासा देण्याऐवजी केवळ वाटाघाटीत वेळ घातला जात असल्याने सामान्य नागरिकही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत.

महापालिका प्रशासनाने ट्रॅव्हल्स टाईम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे, श्यामश्यामा सव्‍‌र्हिस सेंटर दिल्ली, स्मार्ट सिटी बससेवा नागपूर या तीन कंपन्यांना नव्याने बससेवा चालविण्याचे कंत्राट देऊन त्यांच्याशी करार केला. १ मार्चपासून नव्या ऑपरेटरच्या माध्यमातून ही बससेवा सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा चालक-वाहकांनी संप पुकारला आहे.

हिंगणा आणि खापरी डेपोमधून सकाळपासून बसेस बाहेर निघाल्या नसून चालक- वाहकांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेषत: कोराडी, कामठी, हुडकेश्वर या भागात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी आणि चाकरमाने ये-जा करीत असतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या भागात बसेस पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अनेक लोकांचे हाल झाले. त्यात ऑटोचालकांचे भाव वाढल्यामुळे नागरिकांना जादा पैसे मोजून आणि त्यांच्या मनमानीपुढे झुकून शहरात प्रवास करावा लागत आहे. शहरात एकमेव ग्रीन बस धावत असताना ती सुद्धा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. ट्रान्सपोर्ट व्हेकल अ‍ॅक्टनुसार शासकीय आदेशानुसार जे वेतन आहे ते देण्यास महापालिका प्रशासन तयार असताना त्यांना वाढीव वेतन पाहिजे. त्यामुळे प्रशासन, चालक-वाहक संघटना आणि पदाधिकारी यांच्या वादात सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.  बससेवा देणाऱ्या कार्यरत कर्मचाऱ्यांना २४ फेब्रुवारी २०१५ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार वेतन लागू करण्यात यावे. शहर बससेवा चालविण्याचे कंत्राट तीन खासगी कपन्यांना देण्यात आले. त्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन देणे आवश्यक आहे, मात्र चालक आणि वाहकांना कमी वेतन दिले जात आहे. त्याचे वेतन निर्धारित करण्याचे कंत्राट खासगी कंपनीला दिले असल्यामुळे महापालिका प्रशासनाने हा चुकीचा निर्णय घेतला आहे, असे कामगार नेता जम्मू आनंद यांनी सांगितले.

बस चालक-वाहकांचा संप मागे

गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या आपली बस सेवेतील चालक-वाहक परिवहन संघटनेचा सुरू असलेला संप गुरुवारी कामगार आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. उद्या, शुक्रवार सकाळपासून सर्व चालक-वाहक कामावर रुजू होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन दिवसांपासून चालक-वाहकांच्या वेतनासंदर्भात चालक-वाहकांनी संप पुकारला असताना शहरातील परिवहन सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या परिवहन विभागाशी चर्चा सुरू असताना कुठलाच तोडगा निघत नव्हता. दरम्यान, सायंकाळी कामगार आयुक्त डी.एस. शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कामाच्या तासाबाबत मागणीचा निर्णय मान्य करण्यात आला. वेतनासंदर्भात चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन चालक-वाहक परिवहन संघटनेला दिल्यावर संप मागे घेण्यात आला. दरम्यान, २४ एप्रिलला या सदर्भात पुन्हा कामगार आयुक्तांसोबत बैठक होणार आहे.

महापालिकेच्या परिवहन विभागाने आणि संबंधित ऑपरेटर कंपनीने चालक आणि वाहक यांच्या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा आणि ते जर सकारात्मक प्रतिसाद देत नसतील तर आयुक्तांनी तात्काळ नवीन व्यवस्था उभी करावी. मात्र, जनतेला वेठीस धरू नये.

संदीप जोशी, महापालिका सत्तापक्ष नेता

कंपनीसोबत झालेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. वाढीव वेतनाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली. मात्र, त्यांना लेखी हमी हवी आहे. ज्यांची नियुक्ती वाहक म्हणून केली आहे त्यांना बेसिक ५ हजार ३०० तर चालकांना ५ हजार ६०० वेतन दिले जात आहे. पहिल्या महिन्यात काही अडचणी आल्या आहेत. मात्र, त्यावर निर्णय घेऊन पुढील महिन्यात वेतन नियमित सुरू होईल. चालक आणि वाहकांनी संप मागे घेतला नाही तर आम्हाला पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांच्यावर कारवाई करून नवीन चालक-वाहकांची नियुक्ती करावी लागेल.

शिवाजी जगताप, परिवहन व्यवस्थापक, महापालिका

वंश निमय कंपनीतून दुसऱ्या ऑपरेटरकडे सेवा स्थानांतरित झाली त्यावेळी वाढीव वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता केवळ सहा हजार रुपये दिले जाते. इतक्या कमी वेतनात काम कसे करणार? महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या वेतनानुसार आमचे वेतन वाढवून द्यावे आणि आमचे कामाचे तास निश्चित करावे व या संदर्भात लेखी हमी दिल्यास आम्ही संप मागे घेऊन कामावर जाण्यास तयार आहोत. मात्र, महापालिका प्रशासन आता चर्चा करण्यास तयार नसल्यामुळे संप सुरूच ठेवणार आहे.

अंबादास शेंडे, चालक-वाहक संघटना