शहरातील वीज कंपन्यांकडून दुर्लक्ष; बैद्यनाथ चौकात दोन खांब कारवर पडले
उपराजधानीत अनेक जुने झालेले वीज खांब अद्यापही रस्त्यांच्या मधोमध वा रस्त्याला खेटून उभे आहेत. काहींच्या दुरवस्थेकडे तर वीज कंपन्यांचे त्याकडे लक्षही नाही. असे हे खांब कधीही कोलमडून एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. बैद्यनाथ चौकात सोमवारी दुपारी एका ओव्हर लोड ट्रकने वीज तार ओढली गेल्याने येथील एकमेकांना खेटून असलेले दोन खांब थेट पत्रकार रवींद्र कांबळे यांच्या कारवर पडले. यातून ते बचावले असले तरी या घटनेमुळे शहरातील जुन्या वीज खांबांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नागपूरला मिहान, ‘एमआयडीसी’सह इतर अनेक औद्योगिक वसाहतींचा होत असलेला विकास बघता येथे ग्रामीण भागातून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रोसह अनेक विकास कामांनाही गती मिळाली आहे. परंतु शहरात आजही अनेक भागात जुने झालेले वीज खांब अद्यापही रस्त्यावर उभे आहेत. ते केव्हाही कोलमडून पडण्याचा धोका नागरिकांकडून व्यक्त केला जातो. परंतु, त्याकडे महावितरणचे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास बैद्यनाथ चौकातून पत्रकार रवींद्र कांबळे त्यांच्या चारचाकी वाहनाने कार्यालयाच्या दिशेला जात होते. त्याचवेळी एक ओव्हरलोड ट्रक मेडिकल चौकातून बैद्यनाथ चौकमार्गे घाटरोडच्या दिशेने वळला तेव्हा ट्रकमधील वस्तूंमध्ये वीज तार अडकल्याने ती जोरात ओढली गेल्याने एकमेकांना खेटून असलेले विजेचे खांब थेट रवींद्र कांबळे यांच्या वाहनावर पडले. सुदैवाने कांबळे या अपघातातून बचावले मात्र त्यांच्या कारच्या समोरच्या काचा फुटल्या आणि मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.
वीज खांब पडल्याचे बघून ट्रक चालकाने वाहनासह तेथून पळ काढला. दरम्यान, खांबातून वीज प्रवाह सुरू असल्याचे जाणवल्याने कांबळे यांनी कारच्या समोरच्या दाराला लाथ मारून वेळीच बाहेर उडी घेतली. त्यामुळे ते बचावले. हा प्रकार बघून परिसरातील नागरिकांनी कांबळे यांच्या वाहनाकडे धाव घेतली. घटनास्थळी गर्दी जमल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या वीज तारा कापून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. शहरात सध्या साडेतीनशेहून अधिक चौक असून, अनेक भागात रस्त्यांवर जुने वीज खांब उभे आहे. हे खांब बदलणार वा हटवणार कधी? हा प्रश्न नागपूरकर उपस्थित करीत आहे.

रस्त्यावरील वीज खांब हटणार कधी?
नागपूर महापालिकेच्या हद्दीत आजही मोठय़ा संख्येने रस्त्यांमध्ये वा इतर भागात अनेक वीज खांब उभे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडीही होताना दिसते. महापालिकेकडून तातडीने हे खांब हटवून ते भूमिगत वाहिनी टाकून त्याच्याशी जोडण्याची अपेक्षा नागपूरकरांकडून व्यक्त केली जात होती. परंतु तसे होत नसल्याने हे काम पूर्ण होणार कधी? हा प्रश्न नागपूरकर उपस्थित करीत आहेत.

एसएनडीएलचे महापालिकेकडे बोट
‘एसएनडीएल’च्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, नागपूर महापालिकेकडून ‘आयआरडीपी’ योजने अंतर्गत रस्त्यावरील वा चौकामध्ये येणारे वीज खांब हटवण्यासह भूमिगत वाहिनीतून वीज पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. बैद्यनाथ चौकातील पडलेल्या ११ केव्ही क्षमतेच्या वीज खांबाचे काम महापालिकेकडून रॉयल पॉवर या वेंडरला दिले गेले होते. त्याअंतर्गत सुमारे दहा दिवसांपूर्वी या खांबावरील वीज प्रवाह बंद करून भूमिगत वीजवाहिनीशी जोडण्यात आला होता. एक आठवडय़ात हे खांबही हटवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु ते काम अद्याप झाले नाही. या प्रकरणात एसएनडीएलचा काहीही संबंध नाही.