पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान वापरावर भर दिला. देशात संगणक युगाला सुरुवात केली. १८ वर्षांच्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देऊन लोकशाही प्रक्रियेत सहभागी करवून घेतले. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच आज नवा भारत दिसून येत आहे, असा सूर वक्तयांनी आळवला.

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीव गांधी स्टडी सर्कलतर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात ‘राजीव गांधी-माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि भारतीय राजकीय विकेंद्रीकरणाचे निर्माते’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री अनीस अहमद, माजी आमदार यादवराव देवगडे, प्राचार्य बबनराव तायवाडे, काँग्रेसचे अविनाश काकडे, नगरसेवक बंटी शेळके, काँग्रेस कार्यकर्ते गिरीश पांडव चर्चासत्रात सहभागी झाले होते.

काँग्रेसची विचारधारा देशासाठी बलिदान देण्याची आहे. देशात अशीही एक विचाराधारा आहे, जी बलिदान देण्याऐवजी दुसऱ्याचे प्राण घेण्याचे काम करते. सध्या त्या विचारधारेचा देशात मोठा पगडा आहे. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानावर भर दिला तेव्हा आताचे सत्तेतील लोक विरोध करीत होते. आता ते त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आणि दुरुपयोग करून गाजावाजा करून घेत आहेत. राजीव गांधी यांचे देशासाठीचे योगदान आणि त्याचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेस कार्यकर्ते कमी पडले. आमच्या परस्परातील वादामुळे आज विरोधकांना सत्ता काबिज करता आली, अशी खंत अविनाश काकडे यांनी व्यक्त केली. राजीव गांधीचे विचार देशाला पुढे नेणारे होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला एकेकाळी विरोध करणारे आज त्यांच्याच निर्णयावर आधारित योजना राबवत आहेत. खोटी-नाटी आश्वासने देऊन जनेतेची दिशाभूल करीत आहेत. अशा सरकारला युवकांनी जाब विचारला पाहिजे, असे माजी मंत्री अनीस अहमद म्हणाले.

प्रास्ताविक बबनराव तायवाडे यांनी केले. यावदराव देवगडे यांनी अध्यक्षीय भाषणात राजीव गांधींचे विचार जनतेपर्यंत पोहचविणे हीच त्यांनी खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. गजानन धांडे कार्यक्रमाचे समन्वय होते. संचालन नीलेश कोडे यांनी केले. निकेश किणे यांनी आभार मानले.

राजीव फाऊंडेशनतर्फेरक्तदान शिबीर

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद विरोधी दिवस साजरा करून रक्तदान करण्यात आले. राजीव स्पोट्र्स फाऊंडेशन, जीवन ज्योती ब्लड बँक, नेहरू युवा केंद्र तसेच माऊंट कार्मेल स्कूल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.वर्धा मार्गावरील अजनी चौकातील माऊंट कार्मेल स्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शरद साळुंके, किसान राष्ट्रीय नेते अविनाश काकडे, माजी आमदार देवराव रडके, डॉ. रवि वानखेडे, दहशतवादविरोधी दिवसानिमित्त दिला जाणाऱ्या राज्य युवा पुरस्काराप्रप्त गौरव दलाल यांनी सर्वाना शपथ दिली. यावर्षीचे जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त सचिन गोडे आणि जिल्हा युवती पुरस्कारप्राप्त युवक आंचल मेश्राम यांनी राजीव गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. शिबिराचे मुख्य संयोजक संजय दुधे, संजय राऊत, अजय धर्मे यांनी योगदान दिले. दरम्यान, इंडियन युथ काँग्रेसच्या वतीने दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक बंटी शेळके, आलोक काडापूरवार, नीलेश देशभ्रतार उपस्थित होते.