नागपूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असून यंदाच्या निवडणुकीत आजी आणि माजी आठ महापौर निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता असून ही निवडणूक सर्वाधिक माजी महापौरांची निवडणूक ठरणार आहे.

काँग्रेस आणि भाजपने यंदाच्या निवडणुकीत तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. परंतु या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागण्यात माजी महापौरांचा समावेश देखील आहे. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांकडून किमान सात माजी महापौर मैदानात उतरणार आहेत. महापौर प्रवीण दटके, माजी महापौर विकास ठाकरे, मायाताई इवनाते, अर्चना डेहनकर, राजेश तांबे, किशोर डोरले, देवराव उमरेडकर आणि कल्पना पांडे यांनी उमेदवारी मागितली आहे. साधारणत: विद्यमान महापौर निवडणुकीत रिंगणात असतो. त्या नैसर्गिक न्यायानुसार दटके यांना संधी देण्यात येणार आहे. माजी महापौर आणि महापालिकेतील विरोधीपक्ष नेते विकास ठाकरे हे देखील पुन्हा तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. गेल्यावेळेस अपक्ष निवडणूक लढवलेले माजी महापौर किशोर डोरले यावेळी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर निवडणुकीला सामोरे जावून विजय मिळणाऱ्या नागपुरातील एकमेव महापौर मायाताई इवनाते या तिसऱ्यांदा महापालिका निवडणूक लढवणार आहेत. महापौर झाल्यानंतर पुढील निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या महापौर अर्चना डेहनकर तसेच कल्पना पांडे यांना देखील उमेदवारी हवी आहे. राजेश तांबे हे गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता ते भाजपकडून इच्छुक आहेत. देवराव उमेरडकर यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने त्यांना सहा महिन्यात महापौरपद सोडावे लागले होते. तेदेखील इच्छुकांच्या यादीत आहेत.

भाजप आणि काँग्रेस पक्ष वाढण्याच्या दृष्टीने नवीन चेहऱ्यांना विशेषत युवकांना अधिकाधिक संधी देण्याच्या विचारात आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खासगी संस्थांकडून प्रभागनिहाय सर्वेक्षण देखील केले आहे. भाजपने १२५ जागांचे लक्ष्य ठेवले आहे तर काँग्रेसने १०० जागांवर विजयी पतका फडकवण्यावर भर दिला आहे.

असे असलेतरी काही माजी महापौरांचा प्रभाव बघता त्यांना संधी नाकारली जाईल, असे वाटत नाही. यामुळे तब्बल आठ आजी-माजी महापौर निवडणूक लढवत असलेली ही पहिली निवडणूक ठरण्याची शक्यता आहे.

महिला महापौरांना पराभवाचा धक्का

महापौर प्रवीण दटके, माजी महापौर विकास ठाकरे, मायाताई इवनाते, अर्चना डेहनकर, राजेश तांबे, किशोर डोरले, देवराव उमरेडकर आणि कल्पना पांडे यांनी उमेदवारी मागितली आहे. महिला महापौर कुंदा विजयकर, कल्पना पांडे, वसुंधरा मसुरकर, पुष्पा घोडे, अर्चना डेहनकर यांना महापौरपद प्राप्त झाल्यानंतर पुढील निवडणुकीत पराभवचा धक्का सहन करावा लागला होता. परंतु मायाताई इवनाते यांनी विजय खेचून आणला होता.