• उपमहापौर सतीश होले यांचे मत
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

शहरातील विविध भागात महापालिकेच्या मोठय़ा प्रमाणात मालमत्ता आहेत. गेल्या अनेक वषार्ंत त्याचे मूल्यमापन करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या अनेक खुल्या भूखंडावर दुसऱ्या संस्थांनी ताबा केला आहे. प्रशासनाजवळ त्याची माहिती नसल्यामुळे खासगी संस्थांच्या माध्यमातून शहरातील महापालिकेच्या जागांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांचा आर्थिक उत्पन्न वाढीसाठी उपयोग केला पाहिजे, असे मत महापालिकेचे उपमहापौर सतीश होले यांनी व्यक्त केले.

उपमहापौर होले यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. शहरात मालमत्तेसंदर्भात सर्वेक्षण केले जात असले तरी महापालिकेच्या शहरात किती जागा आहे याचा शोध घेतला पाहिजे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत त्या संदर्भात मूल्यमापन करण्यात आलेले नाही. जागा महापालिकेची, फलक मात्र नागपूर सुधार प्रन्यासचे अशा प्रकारे काही जागांवर अतिक्रमण झाले आहे. नासुप्रच्या जागेवर जसे फलक लावले आहेत, तसेच महापालिकेच्या खुल्या भूखंडावर फलक लावले पाहिजे आणि त्या भूखंडांचा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोग केला तर आर्थिक चणचण राहणार नाही. मालमत्ता कर जे भरत नाहीत त्यांना नोटीस दिल्या जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने कराचा भरणा होणे आवश्यक आहे तो महापालिकेला मिळत नाही. महापालिकेतील विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अधिकाऱ्यांकडे कामाचा बोझा वाढला आहे त्यामुळे प्रशासनाकडून ज्या प्रमाणात कामाची अपेक्षा आहे, ते होत नाही. २५ टक्के घरांचे मूल्यमापन करण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या विविध योजना राबविल्या जात असताना निवडणुकीच्या पूर्वी त्या पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वी मोठय़ा प्रमाणात अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई होती. लोकांना पाणी मिळत नव्हते, मात्र आता शहरातील प्रत्येक भागात भरपूर पाणी आहे. कचऱ्याची समस्या पूर्वीसारखी राहिलेली नाही. सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहेत. त्यामुळे जनतेला जे अपेक्षित आहे आणि भाजपने आपल्या जाहीरनाम्यात ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्यातील अनेक योजना येत्या सहा महिन्यांत पूर्णत्वास येतील. पाण्याची देयके गेल्या अनेक वर्षांपासून थकित होती, ती मिळण्याची अपेक्षा नव्हती त्यामुळे जलप्रदाय विभागाने ‘वन टाईम सेंटलमेंट’ची योजना आणली आणि त्यातून न मिळणारी मोठी रक्कम महापालिकेला मिळाली आहे. जैववैविध्य कचराबाबतचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे. ज्या खासगी एजन्सीकडे काम देण्यात आले आहे, त्यात झोटींग हा कंत्राटदार आहे आणि त्याच्या करारावर गजानन महाराज मंदिर, चंद्रपूर असा पत्ता देण्यात आला आहे. त्यामुळे यावर शंका उपस्थित झाल्यामुळे चौकशीची मागणी केली आहे. ‘मेडिकल वेस्ट’ असलेले साहित्य ४८ तासाच्या आत नष्ट केले पाहिजे. मात्र, ते सर्व डंपींग यार्डमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. मुळात या संदर्भात जो करार केला आहे तो चुकीचा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ते घातक असल्याचे होले म्हणाले. उपमहापौर म्हणून अधिकार असले तरी त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. महापौरांच्या सर्व बैठकींना उपस्थित राहून माहिती घेत असतो, असेही होले म्हणाले.

मीटर तपासणीसाठी एजन्सी

‘ओसीडब्ल्यू’ किंवा एसनएनडीएल’ या खासगी संस्थांच्या माध्यमातून घरोघरी मीटर लावले जात आहेत. लोकांना वाढीव देयके येऊ लागल्यामुळे त्यांच्या तक्रारी वाढल्या आहे. मीटरबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्थाच्यावतीने लावण्यात आलेल्या मीटरची तपासणी करण्यासाठी तिसऱ्या खासगी संस्थाची नियुक्ती केली पाहिजे.

नगरसेवकांनी प्रेमाने बोलावे

नागरिकांच्या अनेक समस्या असताना त्यांच्याशी नगरसेवकांनी प्रेमाने संवाद साधण्याची गरज आहे. नागरिकांना वीज, पाणी, कचरा आणि घरासमोरील रस्ता आदी मूलभूत समस्या असतात. मात्र, त्या सोडविताना नगरसेवकांनी नागरिकांशी प्रेमाने संवाद साधला आणि कामे केली तर अडचणी येत नाहीत, असे उपमहापौर सतीश होले म्हणाले.

– सतीश होले , उपमहापौर