पारंपरिक कपडय़ांना मागणी

दिवाळी म्हणजे आनंदाचा, समृद्धीचा सण. विविध प्रकारच्या फराळाबरोबर घरातील सर्वासाठी कपडय़ांची खरेदी आवर्जून केली जाते. सध्या मोठमोठय़ा कंपन्यांकडून वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली जात आहे. बाजारात गर्दीत जाऊन भरमसाठ किमतीला कपडे खरेदी करण्यापेक्षा घरी बसून जास्तीत जास्त सवलतीमध्ये खरेदीचा पर्याय शहरात दिसून येत आहे. अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलमुळे ऑनलाईन खरेदीचा प्रकार वाढला असल्याचे चित्र आहे.

बाजार फुलायला लागल्यावर दिवाळीची चाहूल लागते. खरेदी करायला हल्ली दिवाळीचे निमित्त लागत नसले तरीही दिवाळीची खरेदी चुकत नाही, हे निश्चित. वर्षभर शॉिपग चालूच असते, तरी दिवाळीची खरेदी विशेष असते. केवळ सणासुदीला केली जाणारी खरेदी आता मनोरंजनाचा एक भाग झाली आहे. कंटाळा घालवण्यासाठी कुणी खरेदी करते, वेळ आहे म्हणून कुणी करते. तरीही दिवाळीची मजा खरेदीशिवाय अपुरी आहे, हे निश्चित.  शहरात दिवाळीचा उत्साह जाणवू लागला आहे. केवळ आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. आकाशदिवे, फटाक्यांचे स्टॉल सजू लागले आहेत. कपडे खरेदीसाठी शहरातील दुकाने गर्दीने फुलली आहेत. दिवाळीची खरेदी करण्यासाठी अक्षरश: दिवाळीपूर्वी १५ दिवसांपासून सर्व बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहतात. कपडय़ांच्या दुकानांमध्ये अक्षरश: पाय ठेवायला जागा नसते. अशावेळी सांगेल त्या किमतीला ग्राहकाला कपडे खरेदी करावे लागतात. सध्या मात्र या खरेदीला ऑनलाईन खरेदीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी ग्राहकांना ऑनलाईन खरेदीसाठी आकर्षति करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. एका वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत, ५० ते ७५ टक्के किमतीपर्यंत सवलत यासारख्या अनेक योजना या कंपन्यांनी आणल्या आहेत. अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलवर या कंपन्यांनी आपली अ‍ॅप्स तयार केल्याने इंटरनेटवरच खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

ऑनलाईन खरेदीमध्ये कपडय़ापासून सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध असल्याने या कंपन्यांमार्फत खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. खरेदी करण्याची पद्धत सहजसोपी असल्याने तसेच वस्तू मिळाल्यानंतर पसे देण्याची तरतूद असल्याने फसवणुकीचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. अगदी ४० ते ५० हजारांपर्यंतच्या वस्तूदेखील या माध्यमातून विकत घेतल्या जात आहेत. इंटरनेटवरून होणाऱ्या खरेदीमध्ये कपडय़ांबरोबरच सर्वाधिक विक्री आहे ती मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या साहित्याची.

या वर्षीच्या दिवाळीची खरेदी बऱ्याच अंशी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुकानदारही याबाबत साशंक आहेत. या वर्षी प्रत्यक्ष खरेदीला कमी प्रतिसाद मिळणार असल्याने दुकानदारांनीही माल आटोक्यातच ठेवला आहे. शहरातील सीताबर्डी, सदर मार्केट, धरमपेठची बाजारपेठ, महाल, गांधीबागेत सायंकाळी खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. ऑनलाईनवर भरपूर सवलती आणि हटके डिझाईन मिळत असल्याने शहरातील बाजारपेठात बाहेरगावून आलेल्यांची खरेदी जोरात सुरू असल्याचे कापड व्यापाऱ्यांनी सांगितले.

ग्राहकांसाठी ‘ऑफर्स’

निवांत बसून खरेदी करायची आणि वर वेगवेगळे डिस्काउंट, फायदेही घ्यायचे ही ऑफर उत्तमच म्हणायची.  ई-कॉमर्सच्या साइट्स सुरुवातीला भारतात आल्या, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. ऑनलाईन शॉिपग आपल्यासाठी नाही, असे म्हणणारा वर्गही होता. वस्तू प्रत्यक्षात न बघता तिची पारख कशी करणार असे त्यांचे म्हणणे होते. आता या स्मार्टफोनच्या काळात हा वर्गही ऑनलाइनकडे वळायला लागला आहे. सुरुवातीला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने ही ऑनलाईन खरेदी करावी लागायची. ‘कॅश ऑन डिलीव्हरी’चा पर्याय सार्वत्रिक नव्हता. आता मात्र बहुतेक सगळ्या शॉिपग साइट्स हा पर्याय देऊ लागल्यानंतर आणि ‘रिटर्न पॉलिसी’देखील आल्यानंतर ‘रिस्क नाही’ असं म्हणत अनेकजण ऑनलाईन शॉिपगकडे ओढले गेले.  ऑनलाईन शॉिपग करणाऱ्यांमध्ये तरुणाई पुढे आहे. सुरुवातीला पुस्तके, अ‍ॅक्सेसरीज यापुरती असलेली ही खरेदी आता मोठय़ा इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, दागिने यांच्यापर्यंत पोहोचली आहे. सणासुदीला पारंपरिक कपडे खरेदीसोबतच नव्या ट्रेन्डलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.