मूत्रपिंड, यकृत, बुब्बुळ, त्वचा दानाचा अनेकांना लाभ

विदर्भात ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानाला फारसा प्रतिसाद नाही, परंतु सेवाग्राम-मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील एका २८ वर्षीय ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानाने समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे. या रुग्णाचे मूत्रपिंड, यकृत, बुब्बुळ, त्वचा विविध रुग्णांना प्रत्यारोपीत केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. महाअवयवदानाची विदर्भातील ही पहिलीच नोंद आहे. रुग्णाचे यकृत विशेष विमानाने मुंबईला नेऊन तेथेही एका रुग्णाला जीवदान मिळाले.

अपघात झालेल्या तरुणाला उपचाराकरिता सेवाग्राम-मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णाकडून उपचाराला योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याचे ‘ब्रेन’ मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर असल्याने त्याचे इतर अवयव काम करीत होते. रुग्णालय प्रशासनाने तातडीने नातेवाईकांना रुग्णाच्या अवयवदानाने अनेकांचे प्राण वाचणे शक्य असल्याचे पटवून सांगितले. नातेवाईकांच्या मंजुरीनंतर अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क केला.

नागपूरला यकृत प्रत्यारोपण होत नसल्याने मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयाशी संपर्क केला. तेथे यकृताच्या प्रतीक्षेत रुग्ण असल्याचे सांगितले. त्यांनी विशेष विमान नागपूरहून मुंबईला हलवण्याकरिता उपलब्ध केल्याने त्यांना देण्याचे निश्चित झाले. याप्रसंगी रुग्णाची एक किडनी प्रत्यारोपणाकरिता सेवाग्राम-मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला तर दुसरी किडनी प्रतीक्षा यादीतील नागपूरच्या केअर रुग्णालयातील रुग्णाला देण्याचे निश्चित झाले. यकृत प्रत्यारोपण केवळ १० तासात होणे आवश्यक असल्याने पोलिसांशी संपर्क करून रुग्णवाहिकेला नागपूर विमानतळापर्यंत कुठेही अडथडा न होता जाऊ देण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.

त्वचा प्रत्यारोपण ऑरेंज सिटी रुग्णालयात होत असल्याने त्यांना ती उपलब्ध करण्याचा निर्णय झाला. पोलिसांची मदत मिळताच रुग्णावर रात्री ३ वाजता शस्त्रक्रिया करून विविध अवयव तातडीने विविध रुग्णालयात पोहचवले. संबंधित संस्थेने पूर्वतयारी केल्याने सगळ्या शस्त्रक्रियाही झाल्या. मुंबईला विमानाने पाठवलेल्या यकृताचीही तातडीने शस्त्रक्रिया झाल्याने तोही रुग्ण स्थिर असल्याची माहिती आहे. एका ‘ब्रेन डेड’ रुग्णामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचण्यासह दोघांना नवीन दृष्टी मिळाली. या रुग्णाच्या त्वचा प्रत्यारोपणाने अनेक जळीत रुग्णांना लाभ होणार आहे. या प्रक्रियेकरिता डॉ. स्मिता परिहार, मोहन फाऊंडेशन, डॉ. प्रशांत राव, डॉ. समीर चौबे, डॉ. संजय कोलते, डॉ. समीर जहागीरदार यांची मदत मिळाली.

एका ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचणे शक्य असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे. या अवयवदानाला सगळ्याच शासकीय व खासगी यंत्रणांनी केलेली मदत महत्त्वाची आहे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानाचे महत्त्व समजून त्याकरिता पुढाकार घेण्याची गरज आहे. विदर्भात एका रुग्णाच्या अवयवदानाने विविध अवयव प्रत्यारोपण होऊन अनेकांना लाभ मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.

– डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर