मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार

उपचाराकरिता गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मनोरुग्णालयाच्या परिचराने स्वच्छतागृहात बलात्कार केला, अशी तक्रार मानकापूर पोलीस ठाण्याला प्राप्त झाली आहे. ही तक्रार एका मनोरुग्णाकडून एका कर्मचाऱ्याच्या विरोधात असल्याने सर्व प्रकारची चौकशी केल्यानंतरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पीडित १३ वर्षीय मुलगी चार महिन्यांपूर्वी श्रद्धानंद अनाथालयातर्फे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल (वॉर्ड क्रमांक-२० मध्ये) करण्यात आली. चार महिने येथे तिच्यावर उपचार करण्यात आले. बुधवार, १९ जुलैला तिची सुटी झाली आणि मनोरुग्णालयात प्रशासनाने तिला श्रद्धानंद अनाथालयाच्या ताब्यात दिले. त्यानंतर तिने मैत्रीणीसोबत चर्चा करताना तिच्यावर १४ जुलैला दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेवणाचा डबा आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात अत्याचार केल्याचे सांगितले. मैत्रिणीने ही माहिती अनाथालयाच्या वॉर्डनला दिली. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन कर्मचाऱ्यांनी मानकापूर पोलीस ठाणे गाठले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. वॉर्ड-२० मध्ये डबे देणारा लोकेश गंगाहेडे या परिचराला ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पीडित मुलीची मेयो रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहवालानंतर तिच्यावर बलात्कार झाला किंवा नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनोरुग्णालय कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

पोलिसांनी लोकेश गंगाहेडे याला ताब्यात घेतल्यानंतर मनोरुग्णालय कर्मचारी अतिशय संतप्त झाले. तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढली. पोलिसांना त्यांचे काम करू द्या, आपण आपले काम करू, असे पटवून दिल्याने कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.

यापूर्वीही त्या मुलीवर अत्याचार

यापूर्वी पीडित मुलगी डॉ. अर्चना पाटील यांच्या अनाथालयात राहात होती. त्या ठिकाणीही एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर डॉ. पाटील यांचे अनाथालय बंद पडले आणि मुलीला श्रंद्धानंद अनाथालयात पाठविण्यात आले.

डीसीपी ऑन होल्ड

या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास एका पोलीस उपायुक्तांनी मानकापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क केला. परंतु, निरीक्षकाने उपायुक्तांचा भ्रमणध्वनी ‘होल्ड’वर ठेवला. काही वेळाने उपायुक्तांना निरीक्षकसाहेब दूरध्वनी करतील, असे सांगण्यात आले. परंतु अर्धा ते पाऊन तास निरीक्षकांनी उपायुक्तांना दूरध्वनी केला नाही. पोलीस विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अशाप्रकारे वागण्याचा हा क्वचितच प्रसंग असावा. पोलीस ठाण्यातून माहिती लपविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरण दडपून आरोपीला वाचविण्यासाठी मानकापूरचे अधिकारी प्रयत्न करीत असल्याची चर्चा वर्तुळात आहे.

पुरुषांना वॉर्डमध्ये प्रवेशच नाही

ज्या वॉर्ड-२० मध्ये मुलगी राहतात त्याच्या मागे दोन वॉर्ड असून ते महिलांचे आहे. त्या ठिकाणी  पुरुष कर्मचाऱ्यांना प्रवेशच नाही. ज्या कर्मचाऱ्यांवर अत्याचाराचा आरोप आहे, तो केवळ प्रवेशद्वारावर डबे पोहोचवतो. त्यानंतर आतमध्ये डबे महिला कर्मचारी घेऊन जातात. शिवाय पीडित मुलीला भास होण्याचा आजार (‘सायकोसिक एनओएस विद अटेंशन डीएसएच अटेंम्प्ट’) आहे. या आजारात रुग्ण स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी कोणत्याही प्रकारची कृती करीत असतो.

डॉ. आर. एस. फारुखी, डॉ. प्रवीण नवखरे, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय