साहित्य संमेलनाध्यक्षपद निवडणूक

बडोदा येथील आगामी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी एकूण पाच अर्ज आले आहेत. त्यात डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान ही साहित्यिक मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असून यापैकी दोघांचा वैदर्भीय साहित्यिक उमेदवारांच्या भेटीचा सोहळा आणि भेटीगाठी साहित्य संघाने आयोजित करून कर्तव्य पूर्ण केले आहे. मात्र, संस्थेचा नेमका उमेदवार कोण आणि कोणाला पाठिंबा आहे, असा सवाल आता निर्माण झाला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात असल्यामुळे बडोद्यातील आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान पुन्हा यावर्षी वैदर्भीय साहित्यिकाला मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साधारणत: दरवर्षीच्या निवडणुकीचा आलेख बघता ज्या उमेदवाराला घटक संस्थांची एकगठ्ठा मते मिळतील तो हमखास विजयी होतो. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे आणि डॉ. मदन कुळकर्णी हे दोन वैदर्भीय साहित्यिक रिंगणात होते आणि दोघांचा मतदार जवळपास सारखाच होता.

मात्र, त्यात डॉ. काळे यांना विदर्भातून चांगले मताधिक्य मिळाले व ते विजयी झाले होते. यावेळी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे आणि संत साहित्याचे अभ्यासक किशोर सानप हे दोन वैदर्भीय साहित्यिक रिंगणात आहेत. विदर्भ साहित्य संघाचे आजीव सदस्य असलेल्या दोन्ही साहित्यिकांनी कुठल्याही परिस्थितीत नामांकन अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. शोभणे यांनी गेल्यावर्षी नामांकन अर्ज भरला होता. मात्र, डॉ. काळे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळे यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. वि.सा. संघाचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना केला होता.

शोभणे यांनी वि.सा. संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. याशिवाय साहित्य संघाचे आमंत्रक म्हणून ते कार्यकारिणीत होते. दुसरीकडे ज्येष्ठ साहित्यिक किशोर सानप यांचाही साहित्य संघाशी जवळचा संबंध असून वि.सा. संघातर्फे गोंदिया येथील साहित्य संमेलनाचे आणि नरखेडमधील जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

शिवाय संत साहित्याचा त्यांचा अभ्यास असून मोठा चाहता वर्ग आहे. सानप यांनी विदर्भासह मराठवाडा, मुंबई आणि पुण्यामध्ये मतदारांशी जनसंपर्क सुरू केला आहे आणि सर्वात शेवटी ते विदर्भातील मतदारांच्या भेटी घेतील. अन्य तीन उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान आणि रवींद्र गुर्जर या साहित्यिकांचा चाहता वर्ग विदर्भात आहेच. त्यामुळे त्यांनाही येथील काही मते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वि.सा. संघाचा उमेदवार नेमका कोण? आणि कोणाच्या पारडय़ात ही मते पडतील, हे मात्र मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.