कल्पना विश्वात रमणाऱ्या आभासी शेती साहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी कृषी जगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्य विश्वासोबत सांगड घालण्यासाठी २० व २१ फेब्रुवारी २०१६ला वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
नव साहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नव तंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य क्षेत्राकडून कृषी जगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा. रं. उर्फ रावसाहेब बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार व शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी जबाबदारी स्वीकारली असून उद्घाटन सोहळ्याला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित राहतील.
साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे स्वरूप साहित्यिकांना कल्पना विस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलनामागे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान व शासकीय धोरण, मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव, शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून, शेती साहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान, चालू दशकातली शेतकरी कविता, शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज अशा विविध विषयांवरील एकूण सात परिसंवाद राहणार आहे.
या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, डॉ. शेषराव मोहिते, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संजय पानसे, शेतकरी नेते रवी देवांग, गुणवंत पाटील, सरोज काशीकर, प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, कडुआप्पा पाटील, संजय कोले, शेतीविषयाचे गाढे अभ्यासक डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. डी.एन. राऊत, गोविंद जोशी, अजित नरदे, अनिल घनवट आदी सहभागी होणार आहेत.
नव साहित्यिकांना शेतकरी आत्महत्यांच्या दाहक वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून हा विशेष परिसंवाद ठेवण्यात आला आहे. परिसंवादात विदर्भातील ज्येष्ठ, व्यासंगी व अनुभवी पत्रकार सहभागी होणार आहेत.
संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. ज्ञानेश वाकुडकर भूषवतील. या संमेलनात शरद जोशी विशेषांक, प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह, गंगाधर मुटे लिखित नागपुरी तडका या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रात्री १० वाजता नवनाथवार लिखित ‘तुला कसला नवरा हवा’ ही एकांकिका सादर केली जाईल.