प्रसिद्ध वकील व विदर्भवादी चळवळीतील प्रमुख नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर राजकीय पक्ष स्थापून निवडणूक लढण्याचा इरादा व्यक्त केला आहे. लोकशाहीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच करायला हवे. मात्र, अणेंच्या या निर्णयावर विदर्भात साधकबाधक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुळात त्यांचा हा निर्णयच अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. विदर्भाच्या मागणीला जनतेचा पाठिंबा आहे की नाही, यावरूनच संभ्रमाची स्थिती आहे. या मागणीला विरोध करणारे व त्याचे वरवर समर्थन करणारे पण ही मागणी राजकीय मुद्दा म्हणून कायम राहावा, या मताचे असलेले राजकीय पक्ष नेमका याच संभ्रमाचा आधार आजवर घेत आले आहेत. ही संभ्रमावस्था दूर करायची असेल, तर मोजकेच पर्याय समोर येतात. त्यापैकी लोकचळवळ उभारणे हा एक, तर निवडणुकीच्या माध्यमातून जनमत अजमावून पाहणे हा दुसरा. अणेंनी दुसरा पर्याय निवडला आहे. या मुद्यावर राजकीय मतैक्य हा तिसरा आणि महत्त्वाचा पर्याय आहे, पण तो अंमलात येणे शक्य दिसत नसल्याने अणेंनी थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. आंदोलन व चळवळी करून विदर्भ मिळणार नाही, तर व्यवस्थेचा भाग होऊन संघर्ष केला तरच ही मागणी मान्य होईल, असा अणेंचा युक्तिवाद आहे. कागदावर हा युक्तिवाद तर्कसंगत वाटतो, पण प्रत्यक्ष व्यवहारात तो भाबडा आशावाद ठरेल, अशीच भीती साऱ्यांच्या मनात आहे.

थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची प्रेरणा अणेंनी केजरीवालांकडून घेतली असावी, असे मानण्यास बराच वाव आहे. मात्र, केजरीवालांनी हे करण्याआधी जनतेच्या प्रश्नावर, लोकपाल व भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत मोठे आंदोलन केले होते. यातून त्यांनी अनेकांना सोबत जोडले, कार्यकर्त्यांची फळी तयार केली, जनतेच्या मनात स्थान निर्माण केले व मगच पक्ष स्थापून निवडणुकीत यश मिळवले. पक्ष व निवडणुकीची घोषणा करणाऱ्या अणेंच्या नावावर यातील काहीही नाही. ते विदर्भवादी असले तरी भाषणे देण्याशिवाय त्यांची कृती पुढे गेलेली नाही. आंदोलन व चळवळ तर त्यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट झाली. केवळ भाषणे देऊन जनता प्रभावित झाली, म्हणजे सोबत आली व त्याचे आता मतांमध्ये रूपांतर होणार, असा भ्रम तर अणे बाळगत नाही ना, अशी शंका घेण्यास बरीच जागा आहे. मुळात आंदोलन करणे, लाखांचे मोर्चे काढणे व निवडणुकीत यश मिळवणे, या भिन्न गोष्टी आहेत. अणेंच्या पाठीशी तर आंदोलनाचाही इतिहास नाही. अशा स्थितीत त्यांना निवडणुकीत यश मिळेल का, हा कळीचा प्रश्न सध्या इतर विदर्भवाद्यांना सतावत आहे. समजा, अणेंच्या पक्षाला दणदणीत पराभव बघावा लागला, तर आज त्यांच्या नावाचा केक कापणारी मनसे त्यांचा जाहीर सत्कार करेल, यात शंका नाही. विदर्भाच्या मुद्यावर नेहमी जनतेच्या मनाची भाषा बोलणारे शरद पवार आता हा मुद्दा कायमचा संपला, असे म्हणत मोकळे होतील. विदर्भाच्या मागणीचे समर्थन करणारा पण राज्यातील सत्ता गमावण्यात अजिबात इच्छुक नसलेला भारतीय जनता पक्ष समाधानाचा मोठा सुस्कारा सोडेल. या मागणीला कडाडून विरोध करणारे शिवसैनिक अणेंच्या पक्षाचा पराभव शिवतीर्थावर दणक्यात साजरा करतील. विदर्भाच्या मुद्यावरून नेत्यांमध्येच मतभेद असलेला काँग्रेस पक्ष पुन्हा मौनात जाईल. नेमकी हीच भीती सध्या इतर विदर्भवाद्यांच्या मनात घोंघावते आहे.

अणेंना यश मिळणारच नाही, अपयशच पदरी पडेल, असे या वाद्यांना का वाटते, या प्रश्नामागची अनेक कारणे संयुक्तिक आहेत. विदर्भवाद्यांच्या अनेक चळवळी आजवर झाल्या, पण जांबुवंतराव धोटेंचा अपवाद वगळता निवडणुकीत कुणालाच यश मिळाले नाही. धोटेंना यश मिळाले, त्यामागे मोठा जनसहभाग असलेले आंदोलन होते. अणेंच्या मागे राजकीय वारसा सोडला, तर बाकी काहीही नाही. अणे हुशार आहेत, आक्रमक आहेत, पण राजकारणात नवख्या ्सलेल्या त्यांच्या पक्षाला सामान्य जनतेने का म्हणून मते द्यायची? निवडणुकीत मतदान करणारा मतदार राजकीय अंगाने विचार करतो, मत वाया न जाऊ देण्याकडे त्याचा कटाक्ष असतो. स्थिरावलेल्या राजकीय पक्षातून एकाची निवड करण्याची त्याची वृत्ती अनेकदा दिसून आलेली आहे. निवडणुकीच्या काळात उठणाऱ्या या आंतरिक प्रवाहांचा अणेंनी विचार केला आहे काय? तो न करता तसेच कोणताही लढा न उभारता जनतेचे पाठबळ आहे, असे गृहीत धरून लढण्याची घोषणा अणे कशाच्या बळावर करत आहेत? निवडणुकीत जर अपयश आले, तर ही मागणीच पातळ होईल, अशी भीती जी इतर विदर्भवाद्यांना वाटते ती अणेंना वाटत नाही काय?, यासारख्या अनेक प्रश्नांचे मोहोळ सध्या या वाद्यांच्या वर्तुळात फिरू लागले आहे. सध्याचा विचार केला, तर विदर्भवाद्यांचे पाच ते सहा गट अथवा आघाडय़ा सक्रिय आहेत. यात वेगवेगळ्या विचारांचे, विविध पक्षांशी जोडले गेलेले नेते, कार्यकर्ते एकत्र आलेले दिसतात. या सर्व आघाडय़ांना या एकाच प्रश्नावर लढण्यासाठी एकत्र येणे सुद्धा आजवर जमलेले नाही. हे जनतेला बरोबर कळते. तरीही त्यांनी या वेगवेगळ्या आघाडय़ांच्या मागे का जावे? खुद्द अणेंच्या आघाडीत वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. ते निवडणूक आली की, आपल्या विचारांना प्राधान्य देतात, हा आजवरचा अनुभव आहे. अशा स्थितीत या आघाडीत उरेल कोण?, यावरही या सर्व वाद्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

मागणी एक, पण ती समोर करणाऱ्यांचे झेंडे मात्र वेगवेगळे, अशा स्थितीत मतदार यांच्यामागे कशाला जाईल?, या साध्या दृष्टिकोनाचा विसर या विदर्भवाद्यांना पडला आहे. शेजारचे तेलंगण झाले ते मोठय़ा लोकचळवळीतून आलेल्या दबावामुळे! अशी लोकचळवळ उभारण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. विदर्भात ती तयारी कुणाची दिसत नाही. तरीही जनतेने आपल्यामागे यावे, अशी अपेक्षा हे लोक करत राहतात. लोकचळवळीतून निर्माण होणारा दबावच या मागणीचा सोक्षमोक्ष लावू शकतो. यातून वैदर्भीय जनतेला या मागणीत रस आहे का, याही प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल, पण नेमका तेथेच कुणी पुढाकार घेत नाही व तुणतुणे वाजवत राहतात, हे दुर्दैवच, दुसरे काय?

देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com