राज्यात दोनच ठिकाणी डॉप्लर रडार
बदलत्या हवामानाचे आणि त्या बदलामुळे होणाऱ्या धोक्याचे संकेत देणारे नागपूर येथील ‘डॉप्लर रडार’ अनेक वर्षांंपासून ९९ टक्के बंद, तर १ टक्काच सुरू असते. त्याच्या दुरुस्तीसाठी कुणीही समोर येण्यास तयार नाही आणि दुरुस्ती झाली तरीही त्याचा उपयोग काय, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर अशा दोनच ठिकाणी डॉप्लर रडार बसवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेब्रुवारी २०११ मध्ये बसवण्यात आलेले हे रडार उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच बंद पडले. त्याच्या दुरुस्तीसाठी येथील हवामान खात्याने दिल्लीकडे बोट दाखवत हात झटकले, तर दिल्लीने रडार खरेदीदरम्यान चीनशी दुरुस्तीसंदर्भात करार केला नसल्याने काहीही बोलू शकत नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. रडारच्या नादुरुस्तीमुळे भोपाळपासून खालच्या भागापर्यंत आणि मुंबईपासून नागपूपर्यंतचा हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणाच आता उपलब्ध नाही. डॉप्लर रडारमुळे ढग, वारा, गारा, वादळ यांची स्थिती आणि त्यांचा आलेख सॅटेलाइटवर येत असला तरीही त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याची सूचना देणारे तंत्रज्ञान हवामान खात्याजवळ नाही. अमेरिकेतील डॉप्लर रडारवरून तेथील हवामान खाते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट धोक्याची सूचना पोचवते. एखाद्या ठिकाणी गारपीट होणार असेल तर संकेतस्थळावर त्याविषयी सूचना येतात. समाजमाध्यमांसोबतच नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर सचित्र सूचना तात्काळ पोहोचतात. अमेरिका व भारतात हवामान खाते एकाच वेळी सुरू झाले. मात्र, दोन्ही देशातील हवामान खात्याच्या काम करण्याच्या पद्धतीत प्रचंड अंतर आहे. भारतात डिसेंबर २०१४ मध्ये भ्रमणध्वनीवरील संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना हवामान बदलाच्या धोक्याची सूचना देऊन त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला नेमकी कुणाची कुठे नजर लागली, हे कळायला मार्ग नाही.
१० टक्के मृत्यू विजेमुळे
अमेरिकेत एका वर्षांत सुमारे २५ दशलक्ष वेळा वीज पडते, पण तरीही त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ४९ च्या आसपासच आहे. २०१५ मध्ये ती त्याहूनही कमी म्हणजे केवळ २६ इतकी होती. त्याच वेळी भारतात २०१४ मध्ये वीज पडल्यामुळे झालेल्या मृत्यूची संख्या २५०० वर होती. भारतात वर्षभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे १० टक्के मृत्यू हे केवळ वीज अंगावर पडल्यामुळे होतात, असे राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसाळ्यात गारपीट आणि विजेचा जेवढा फटका बसत नाही त्यातून कितीतरी अधिक पटीने फेब्रुवारी-एप्रिल दरम्यान गारपिटीचा फटका बसतो. याच काळात रडारची अधिक गरज भासते. यंदाही गारपिटीचा धोका टळलेला नाही. त्यामुळे हे संकट कधीही येऊ शकते आाणि अशावेळी विमानेच नाही, तर साऱ्यांनाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेसारखे तंत्रज्ञान व पद्धती अवलंबली जाणार नाही, तोपर्यंत रडार दुरुस्त होऊनही काही उपयोग होणार नाही.
– अक्षय देवरस, हवामान अभ्यासक