कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे, या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या वादग्रस्त विधानामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला. यवला तालुक्यातील धुळगाव ग्रामस्थांनी शुक्रवारी शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावेळी ग्रामस्थांनी नायडू यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त केला. पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये केले होते. पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणूकीस खुला करण्याचा शुभारंभ गुरुवारी मुंबई शेअर बाजारात झाला. यावेळी नायडू यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे वक्तव्य केले होते.