त्र्यंबकेश्वरनजीक चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न; संतप्त जमावाची जाळपोळ; वाहतुकीचा खोळंबा
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधाचे सत्र अद्याप सुरू असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे पडसाद रविवारी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उमटले. संतप्त जमावाने नाशिक-त्र्यंबकेश्वरसह मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी रास्ता रोको, एसटी बसवर दगडफेक असे प्रकार केल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू झाली नव्हती. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलक अधिकच संतप्त होऊन त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक तसेच आग लावण्यास सुरुवात केली. त्यात पोलीस महानिरीक्षकांच्या वाहनाचीही तोडफोड झाली. पोलिसांच्या पाच ते सहा तसेच राज्य परिवहनच्या १५ गाडय़ांचे दगडफेक व आगीत नुकसान झाले.
त्र्यंबकेश्वरजवळील तळेगाव येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १५ वर्षांच्या मुलाने घराशेजारीच राहणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेस परिसरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. बालिकेची परिस्थिती पाहून पालकांनी तिला त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत संशयितास ताब्यात घेऊन तो अल्पवयीन असल्याने पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस ठाण्यासमोर मोठय़ा प्रमाणावर जमाव जमला. जमावाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, पीडित बालिकेस रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालिकेवरील अत्याचाराची माहिती जिल्ह्य़ात इतरत्र पसरताच मध्यरात्रीपासूनच मुंबई-आग्रा महामार्ग तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर ठिकठिकाणी जमाव रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भेट दिली. जमावाशी चर्चा करीत असतानाही घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे महाजन यांना शांततेचे आवाहन करीत नाशिकला परतावे लागले.
प्रवाशांची गैरसोय
मुंबई-आग्रा महामार्गावर घोटीपासून नाशिकपर्यंत ठिकठिकाणी वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडल्याने राज्य परिवहन विभागाने या मार्गासह दुपारनंतर नाशिकहून इतरत्र जाणारी सर्व मार्गावरील बससेवा बंद केली. शहरात काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाल्याने शहर बससेवाही बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन शहरातील सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. दिवसभरात सात गाडय़ा जाळण्यात आल्या, तर आठ गाडय़ांची तोडफोड झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी दिली.
बलात्कार झाला नाही : वैद्यकीय अहवाल
दरम्यान, पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा रुग्णालयात पीडित बालिकेसह तिच्या पालकांची भेट घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेतली. बालिकेवर बलात्कार झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असल्याचे महाजन यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येईल. समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन महाजन यांनी केले.
पोलिसांची वाहने लक्ष्य
- त्र्यंबकेश्वर मार्गावर ठिय्या दिलेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर संतप्त जमावाकडून दगडफेकीस सुरुवात.
- पोलिसांच्या तीन ते चार वाहनांसह काही खासगी वाहने जाळण्यात आली. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली.
- रास्ता रोकोचे लोण इतरत्र पसरून नाशिक-घोटी, सिन्नर-घोटी या मार्गावर तसेच ओझर, नामपूर येथे काही वेळ वाहतूक रोखून धरण्यात आली.
- घोटीजवळ सिन्नर चौफुलीवर सुरू झालेले आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत कायम राहिल्याने महामार्गावरील वाहतूक उशिरापर्यंत सुरू झाली नव्हती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नाशिकमधील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. समाजमाध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी शांतता पाळावी. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री