नाशिक जिल्हा आयटक अधिवेशनात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी, कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असून कामगार व कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन आयटकचे प्रदेश सरचिटणीस श्याम काळे यांनी केले. येथे रविवारी आयोजित आयटकच्या जिल्हा अधिवेशनात काळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी २०१६-२० या कालावधीसाठी व्ही. डी. धनवटे यांची जिल्हा अध्यक्ष, तर अ‍ॅड. दत्ता निकम यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात आयोजित जिल्हा अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा सुनंदा जरांडे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे हे उपस्थित होते. या वेळी जिल्ह्य़ातील आयटकच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. विविध असंघटित क्षेत्रात कार्यरत कामगार, कष्टकऱ्यांचे प्रश्न तालुका व जिल्हा स्तरावर प्रभावीपणे सोडविण्याचा संकल्प करण्यात आला. अधिवेशनात कोपर्डी येथील घटनेचा निषेध, मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उद्ध्वस्त करणाऱ्यांचा निषेध व रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, दोन सप्टेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करावा, घर कामगार, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार, मंडळासाठी पूर्णवेळ कर्मचारी द्यावेत, शिष्यवृत्ती, विमा, सन्मानधन, सामाजिक सुरक्षा व इतर थकीत लाभ त्वरित द्यावे,

मानधनावर कंत्राटी व कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांना किमान वेतन १८ हजार रुपये व सामाजिक सुरक्षा द्यावी, गिरणारे येथील आशा कर्मचारीचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे ठराव संमत करण्यात आले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दत्ता निकम होते. या वेळी २०१६-२० या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीसपदी राजू देसले, तर शहर अध्यक्षपदी अ‍ॅड. राजपाल शिंदे, कार्याध्यक्षपदी रावसाहेब ढेमसे, सरचिटणीसपदी विमल पोरजे यांची निवड करण्यात आली.

या वेळी राज्य सचिव राजू देसले, ज्योती नटराजन, मनरेगा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा संगीता उदमले, शेतमजूर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता शर्मा, ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कदम, आशा संघटनेच्या सचिव माया घोलप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. राजपाल शिंदे यांनी केले. आभार ओंकार जाधव यांनी मानले.

 

दिंडोरीजवळील अपघातात एक ठार

जिल्ह्य़ातील वणी-दिंडोरी रस्त्यावर रविवारी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जखमी झाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिंडोरीचे नितिन चटवले आणि गोविंद पवार हे दोघे दुचाकीवरून जात असताना वणीकडून दिंडोरीकडे येणाऱ्या कारशी दुचाकीची धडक बसली. या अपघातात चटवले यांचा मृत्यू झाला. तर, पवार हे जखमी झाले. वणी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.