लासलगावलगतच्या धरणगांव वीर येथील सोळावर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात संगमनेर येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे, संशयितांमध्ये पीडित युवतीच्या भावजयीचाही सहभाग असल्याचे पुढे आले आहे.

लासलगावजवळील धरणगांव वीर येथील एका व्यक्तीने लासलगाव पोलीस ठाण्यात आपल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात संशयिताने २० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता पळवून नेल्याची तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी

तपासाला गती दिली. दरम्यानच्या काळात पीडित युवतीने आपल्या मामाला फोन करून माहिती देताच रविवारी दुपारी पीडित युवतीला पोलिसांनी लासलगाव येथे आणले. त्यानंतर तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेची भावजय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका गावातील आहे. माहेरच्या गावात राहणाऱ्या सोमनाथ शिंदे या युवकाला तिने प्रोत्साहन दिले. वारंवार अत्याचार करण्यात आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमनाथ शिंदेसह त्याच्या दुचाकीवर फूस लावून पळून नेण्यास मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला. त्या वेळी पीडितेची भावजय दिवाळीत माहेरी जात असल्याचे सांगून गायब झाल्याचे आढळले. या प्रकरणात सोमनाथ शिंदे (रा. कोकणगाव, ता संगमनेर) व प्रोत्साहन देणारी भावजयी तसेच अन्य एक साथीदार अशा तिघांविरुद्ध लासलगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरारी संशयितांचा शोध विशेष तपास पथक घेत असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली.