बी – १० टाइप ओनर्स असोसिएशन, बेलापूर, सेक्टर- ४

आरामदायी जीवनाचा तोटा म्हणजे तरुण पिढी आळशी बनत जाते, मात्र बेलापूर येथील बी-१० या संकुलात, येथील मुलांना लहानपणापासूनच निर्मितीक्षम करण्यासाठी धडपड सुरू आहे. मुलांच्या कलागुणांना ओळखून त्यांना भविष्यासाठी तयार केले जात आहे.

बेलापूर सेक्टर-४ येथे ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेले बी १० ही १०० घरटय़ांची सिडको वसाहत. तरुण पिढीला सतत नव्या गोष्टी शिकवण्यास प्रोत्साहित करणे, हे या सोसायटीचे वैशिष्टय़. भावी पिढी कार्यक्षम बनविण्यावर अधिक भर दिला जातो. तरुणाई, लहान मुले ही शालेय क्षेत्रात हुशार असली पाहिजेत पण दुसरीकडे त्यांच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता वाढवली जाते. सायली आर्ट झोनच्या माध्यमातून मुलांना चित्रकला, ग्लास पेंटिंग, अशा अनेक कलांचे प्रशिक्षण दिले जाते. गणेशोत्सव जवळ येताच मुलांना पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मूर्ती बनविणे, त्यांना रंगविणे याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच दिवाळीत विविध प्रकारचे कंदील बनविण्याचे प्रशिक्षण देतात. तसेच चित्रकला, ग्लास पेंटिंग यातून मुले इंटरमिजिएट स्पर्धेत सहभागी होतात. मुलांना नुसते प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांनी आत्मसात केलेल्या कलेला वाव, प्रोत्साहन देण्यासाठी महिन्यातून एकदा संकुलातील मुलांमध्ये स्पर्धा घेतली जाते.

संकुल तसे मध्यमवर्गीयांचे आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक वेळा आर्थिक समस्या निर्माण होत असे म्हणून येथे महिलांनी पुढाकार घेऊन स्वयंरोजगारासाठी महिला बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या बचत गटाकडून सणासुदीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करून ते बाजारात विकले जातात. यात प्रामुख्याने नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी हे सण आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध मसाले, वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ तयार केले जाते. महिला बचत गटात ३ विभागांत एकूण ६० महिला आहेत. या तिन्ही गटांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

तरुणांसाठी प्रशांत स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. नवरात्री, गणेशोत्सवात या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धा, नृत्य, पाककला स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यक्रम साजरे केले जातात. यासाठी सावित्रीबाई फुले सभामंडप बांधण्यात आले आहे.

सर्वसमावेशक सण

संकुलात विविध धर्माचे लोक एकोप्याने राहतात. त्यामुळे १२ महिने संकुलात उत्सवांची धूम असते. यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. रामनवमी, दत्त जयंतीचा सोहळाही येथे साजरा केला जातो.