वाशीतील धोकादायक इमारतींत नागरिकांचे वास्तव्य कायम

घाटकोपरमधील ‘साईसिद्धी’ इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात नवी मुंबई पालिकेने शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक अवस्थेतील इमारतींची यादी जाहीर केली. शहरातील एकूण ३१५ धोकादायक अवस्थेतील इमारतींपैकी ५७ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे जाहीर केले आहे. या इमारतींतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यासाठीच्या नोटिसा पालिकेने बजावल्या असल्या तरी रहिवाशांचे पुनर्वसन कुठे करायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. धोकादायक अवस्थेतील इमारतींतील रहिवाशांना निवासाचा पर्याय म्हणून संक्रमण शिबिरे उभारण्यात न आल्याने नाइलाजास्तव रहिवाशांना जुन्या इमारतींमध्येच जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

वाशीतील ३० वर्षे जुन्या इमारतींची संख्या अधिक आहे. यात ‘जे-एन’ टाइप, गुलमोहर या इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहेत. या इमारतींच्या आवाराबाहेर पालिकेने इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचा फलक लावला आहे; मात्र दोन इमारतींमधील रहिवाशांना पालिकेकडून अद्याप कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याची खंत रहिवाशांना व्यक्त केली. जे-एन टाइप व गुलमोहर इमारतीत सुमारे १६०० कुटुंबे राहत आहेत. या सर्व इमारती पडीक अवस्थेत आहेत. याशिवाय या इमारतींमधून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांचेही प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेला जबाबदार कोण, याची निश्चिती अद्याप झालेली नाही. भविष्यात धोका टाळण्यासाठी येथील रहिवाशांनी जायचे कुठे, असा प्रश्न सतावत आहे. घरमालकाने घर रिकामी करण्यास सांगितले नसल्याची सबब भाडेकरू पुढे करीत आहेत. इमारतीतील घरमालकांनी पालिकेने यावर तातडीने तोडगा काढण्याची तसेच पर्यायी निवासाची सोय करण्याची मागणी अशी रहिवाशांनी केली आहे.

पावसाळ्यात अक्षरश: घरात छत्रीचा वापर करावा लागतो, छपराचे स्लॅब कोसळतच आहे. परंतु काही ठिकाणच्या लोखंडी सळ्या पूर्ण गंजून नाहीशा झाल्या आहेत. येथील रहिवाशांना सध्या अन्य पर्याय उपलब्ध नाही. आम्ही जीव मुठीत घेऊनच जगत आहोत.

नीलेश चिकणे, वाशी

पालिका कायद्याचे पालन करीत आहे. इमारतींच्या पुनर्बाधणी प्रस्तावात नियमावलीनुसार परवानगी देण्यात येत आहे. आजवर १२ इमारतींना परवानगी देण्यात आली आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका