गावठाण, झोपडपट्टी क्षेत्र, नाले व रेल्वे रुळालगत दंडात्मक कारवाई

स्वच्छ नवी मुंबई मिशनअंतर्गत देशातील आठवे आणि राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर असलेल्या नवी मुंबईचे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली हागणदारीमुक्त नवी मुंबईसाठी महानगरपालिकेने ‘गुडमॉर्निग पथक’ संकल्पना राबविली आहे.

उघडय़ावर शौचास बसणाऱ्या इसमांवर पूर्वीप्रमाणेच प्रभावी प्रतिबंध मोहिमा राबवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार या समस्येवरील विभागवार नियंत्रणासाठी ‘गुड मॉर्निग पथका’ची स्थापना केली होती. या अनुषंगाने १९ जूनपासून विभागनिहाय गावठाण, झोपडपट्टी क्षेत्र, नाले व रेल्वे रुळास लागून असलेल्या जागा या ठिकाणी धडक मोहीम हाती घेताना उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार या पथकाने  २६ हजारांची रक्कम वसूल केली आहे. त्याचबरोबर  रस्ते व पदपथांवर कचरा फेकणारे दुकानदार आणि नागरिकांवरदेखील कारवाई करताना १४ हजार ७५० इतका दंड वसूल केला आहे.

महापालिकेच्या रडारवर एमआयडीसी तील कंपन्या

यापुढील काळात एमआयडीसी तील विविध कंपन्यांमध्ये येणारे ट्रक, टेम्पो यांच्यावरही धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल, इंडियन गॅस अशा नामांकित कंपन्यांचादेखील समावेश असणार आहे. या कंपन्यांमध्ये विविध ठिकाणाहून येणारी वाहने इंधन व गॅससाठी रस्त्याच्या कडेला दोन-तीन दिवस उभी असतात. त्यामुळे या वाहनांमधील चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांना प्रातर्विधीची सोयदेखील केलेली नसते. त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या वाहनचालक व अन्य कर्मचाऱ्यांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यानंतरही कंपनीने या पत्राची दखल घेतली नाही, तर पर्यावरण कायदा १९८६ च्या कलम १६(१) अन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास संबंधित कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.