सिडकोने तीन महिन्यांत भरपाई न दिल्यास पालिका पुढाकार घेणार

सावली गावातील घरावर केलेल्या कारवाईची भरपाई तीन महिन्यांत देण्याची मागणी करण्यात येईल, अन्यथा नवी मुंबई महापालिका त्यासाठी पुढाकार घेईल, असा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. या प्रश्नावर महापौर सुधाकर सोनावणे यांच्या दालनात सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रतोदांची बैठक झाली. सावली गावातील प्रकल्पग्रस्तांचे सिडकोने पुनर्वसन केलेले नसताना पालिकेने सेंट्रल पार्कच्या उभारणीसाठी तेथील घरावर कारवाई केल्याचा सोमवारी महासभेत तीव्र निषेध करण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी ही बैठक घेण्यात आली.

घणसोलीजवळ असलेल्या सावली गावातील घरांवर सहा वर्षांपासून अनधिकृत बांधकाम प्रतिबंधक पथकाकडून कारवाई केली जात आहे. या गावाचे अस्तित्वच सिडको आणि पालिकेने नाकारले आहे. या गावाचीच नोंदच नसल्याचे  सिडको प्रशासनाने स्पष्ट केल्यांनतर या विरोधात ‘आगरी कोळी युथ फेडरेशन’सह आगरी कोळी युवक एकटवले होते. सावली गावातील ग्रामपंचायतकालीन घरे पाडल्यानंतर ‘सावली गाव बचाव’ चळवळीने वेग घेतला. नवी मुंबई महापालिका आता याच परिसरात सेंट्रल पार्क उभारणार आहे. त्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी या गावातील एका घरावर कारवाई करण्यात आली. या वेळी मासिक सभेमध्ये ग्रामस्थ तरुणांनी मनपाच्या विरोधात फलक हातात घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या विरोधात जवळपास सर्वच नगरसेवकांनी संताप व्यक्त केल्यानंतर मंगळवारी ही बैठक झाली.

बैठकीला आगरी कोळी युथ फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्ष प्रतोद द्वारकानाथ भोईर, उपमहापौर अविनाश लाड, अनंत सुतार यांच्यासह महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते जे. डी. सुतार, शिवसेनेचे एम. के. मढवी, आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.

तोडलेल्या अधिकृत घराबाबत सिडकोला जाब विचारून सिडको प्रशासनाकडे या कारवाईची भरपाई मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सिडकोने प्रतिसाद न दिल्यास याबाबत मनपा पुढाकार घेईल, असा निर्णयही घेण्यात आला.

– सुधाकर सोनवणे, महापौर